नोबेल पुरस्कार विजेत्यांची नुकतीच नावे जाहीर करण्यात आली. त्यात ४ ऑक्टोबरला मौंगी जी. बावेंडी, लुई ई. ब्रुस आणि अलेक्सी एकिमोव्ह या तीन ज्येष्ठ वैज्ञानिकांना यावर्षीचा रसायनशास्त्राचा नोबेल जाहीर करण्यात आला. क्वांटम डॉट्सचा शोध आणि संश्लेषण याकरिता हा पुरस्कार दिला गेला.
एक नॅनोमीटर म्हणजे एका मीटरचा एक अब्जावा भाग. एक मीटर अंतराचे एक अब्ज भाग केले की त्यातला एक भाग म्हणजे एक नॅनोमीटर! या अतिअतिसूक्ष्म पातळीवर जेव्हा पदार्थ अभ्यासले जातात, तेव्हा गोष्टी फार बदलतात; भोवतीच्या जगात चकाकणारे पिवळे सोने या क्वांटमच्या दुनियेत लाल, नारंगी, जांभळा, निळा असे वेगवेगळे रंग दाखवते. वीस नॅनोमीटरचा सोन्याचा कण लाल असतो. तोच शंभरच्या आसपास निळा असतो. आकार बदलला, की गुणधर्म बदलतात.
कित्येक वर्षांपर्यंत वैज्ञानिकांमध्ये अशी मान्यता होती की, एवढ्या सूक्ष्म पातळीवरील कण तयार करणे अशक्य असल्याने क्वांटमचे जग केवळ तर्क आणि अनुमानांचा भाग राहिल आणि वस्तुस्थितीत आणता येणार नाही. पण १९८०-९० च्या दशकात या मान्यतेला दोन वैज्ञानिकांनी सुरुंग लावला. यातला एक शास्त्रज्ञ रशियात कॉपर क्लोराईडने रंगवलेल्या काचेवर काम करत होता तर दुसरा अमेरिकेत कॅडमियम सल्फाईड नावाच्या पदार्थाचे परिक्षण करत होता.
शीतयुद्धाच्या कृपेने दोघांनाही एकमेकांच्या अस्तित्वाची आणि एकमेकांच्या कामाची कल्पना नव्हती. पण तरीही या दोन वैज्ञानिकांनी दोन वेगवेगळ््या देशांत, दोन भिन्न प्रयोगशाळांमध्ये आणि दोन वेगवेगळ््या पदार्थांवर काम करत असताना या क्वांटम डॉट्सचा शोध लावला आणि सगळ््या जगाला एक असंभव संभव करून दाखवले. या दोन शास्त्रज्ञांची नावे होती एकिमोव्ह आणि ब्रुस! पुढे १९९३ मध्ये बावेंडी यांनी या क्वांटम डॉट्सना बनवण्याची सोपी पद्धत जगासमोर आणली आणि या नवीन शाखेचे दरवाजे जगासमोर खुले झाले.
गेली दोन दशकं या शाखेवर अविरत काम सुरू आहे. आता तुम्ही ज्या स्क्रीनकडे पाहताय, त्या स्क्रीनच्या निर्मितीमध्येसुद्धा हे क्वांटम डॉट्स वापरले गेले आहेत. या कणांना उर्जा दिली की ते विविध रंगाचा प्रकाश बाहेर टाकतात. त्यांच्या या गुणधर्मामुळे त्यांचा वापर डिस्प्ले बनवण्यासाठी तर करता येतोच, पण सोबतच आपल्या शरीरातील व्याधींचा शोध घेणा-या बायो इमेजिंगसारख्या कामातही करता येतो.
आज पारंपरिक ऊर्जा स्त्रोत वेगाने संपत असताना सौरऊर्जा हा एक समर्थ पर्याय आहे. पण सोलार सेल व्यापत असलेली जागा आणि त्या जागेच्या तुलनेत त्यातून मिळणारी ऊर्जा हे गुणोत्तर मात्र आजही समाधानकारक नाही. अशावेळी सोलार सेलसारख्या अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताला अधिकाधिक किफायतशीर बनवण्यासाठीही हे क्वांटम डॉट्स वापरता येणार आहेत. शरीराच्या सूक्ष्मातिसूक्ष्म भागापर्यंत पोहोचून तिथल्या व्याधींवर क्वांटम डॉट्स वापरुन उपचार करण्याच्या पद्धतींवर आजघडीला संशोधन सुरू आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणा-या संशोधकांना असा विश्वास आहे की या क्वांंटम डॉट्सचा वापर करुन ट्यूमरवर केली जाणारी शस्त्रक्रिया सुद्धा सुलभ होऊ शकते.
येत्या काळात मानवी जीवनाशी निगडित प्रत्येक क्षेत्रात या शून्य मितीय कणांचा प्रभाव दिसणार आहे. टीव्ही आणि फोन वापरत असलेल्या प्रत्येकाचे आयुष्य तर आताही या संशोधनाने प्रभावित केलेले आहे. उद्या कदाचित आपले प्राण वाचवण्याची कामगिरीसुद्धा हे संशोधन करणार आहे. मूर्ती (अति) लहान पण कीर्ती महान अशा या कणांच्या शोधाचा सन्मान यावर्षी नोबेलने केला आहे. वीस वर्षांपूर्वीचे हे संशोधन आणि दोन देशांच्या वैज्ञानिकांना गौरवताना विज्ञान हे देशाच्या आणि काळाच्या सीमांपलीकडे आहे हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित होतो आहे.
संतोष नारनवरे, पुणे