स्टॉकहोम : वृत्तसंस्था
नॉर्वेजियन लेखक जॉन फॉस्से यांना यंदाचा साहित्य क्षेत्रातील नोबल पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण नाटकांच्या लेखनासाठी त्यांना या सन्मानाने गौरविण्यात आले. उपहासात्मक शैलीतील लिखाण एका वेगळ््या शैलीत लिहिले. त्यांची हीच शैली पुढे फॉस मिनिमलिझम या नावाने ओळखली जाऊ लागली. त्यांची दुसरी कांदबरी स्टेंज्ड गिटार जी १९८५ मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांच्या या शैलीची प्रकर्षाने जाणीव होते.
फॉस यांचे साहित्य त्यांच्या अस्सल नॉर्वेजियन भाषेत आणि तेथील मातीतील आहे, अशा शब्दात नोबेल साहित्य समितीचे अध्यक्ष अँडर्स ओल्सन यांनी कौतुक केले. फॉस हे त्यांच्या देशातील सर्वात गाजलेल्या नाटककारांपैकी एक असून त्यांनी ४० नाटकांसह कादंब-या, लघुकथा, मुलांसाठी पुस्तके, कविता, निबंध असे वैविध्यपूर्ण व विपुल लेखन केले आहे.
‘नाही रे’ वर्गातील लोकांना त्यांच्या नावीन्यपूर्ण नाटकांतून आणि लेखनातून आवाज मिळाला आहे, असे नोबेल पुरस्कार देणा-या स्वीडिश अकादमीने सांगितले. फॉस यांची पहिली कादंबरी ‘रेड अँड ब्लॅक’ ही १९८३ मध्ये प्रसिद्ध झाली असून त्यात आत्महत्येसारखा गंभीर व संवेदनशील मुद्दा हाताळला. त्यांचा जन्म १९५९ मध्ये नॉर्वेमध्ये झाला. त्यांनी त्यांचे बहुतेक लिखाण हे नॉर्वेजियन निनॉर्स्कमध्ये केले आहे.
या अगोदर २०२२ मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका अॅनी एरनॉक्स यांना देण्यात आला होता. फ्रेंच लेखिका तसेच फ्रेंच साहित्याच्या प्राध्यापिका म्हणून त्यांची विशेष ख्याती आहे. त्यांनी विशेषकरुन आत्मचरित्र आणि समाजाशास्त्रावर लिखाण केले आहे.