१९४७ : १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताच्या सरकारने पहिले टपाल तिकीट जारी केले. जय हिंद नावाने जारी झालेल्या टपाल तिकिटावर मध्यभागी तिरंग्याचे चित्र होते तर डावीकडे इंग्रजीत त्याची किंमत म्हणजे साडेतीन आणे लिहिली होती. तिरंग्याच्या खाली इंडिया लिहिलेले होते आणि तिरंग्याशेजारी १५ ऑगस्ट १९४७ लिहिलेले होते.
१८७७ : ग्रामोफोनचा शोध लागला
थॉमस अल्वा एडिसन यांनी १८७७ मध्ये जगातील पहिला फोनोग्राफ बनवला. या फोनोग्राफमध्ये आवाज रेकॉर्ड करून आणि नंतर एकला जाऊ शकत होता. एडिसन टेलिग्राफ आणि टेलिफोनशी संबंधित शोध लावत होते. कागदाच्या टेपवर संदेश रेकॉर्ड करण्यासाठी आणि नंतर ते टेलीग्राफद्वारे पाठवण्यासाठी ते एक मशीन बनवत होते. याचदरम्यान त्यांना त्यांचाच रेकॉर्ड केलेला आवाज पुन्हा ऐकू आला. एडिसनने मेरी हॅड अ लिटल लँब कविता गात रेकॉर्ड केली आणि पुन्हा ऐकली. फोनोग्राफनंतर ग्रामोफोन म्हणून ओळखला जाऊ लागला.
१९५५ : संयुक्त महाराष्ट्र चळवळीत १५ आंदोलक हुतात्मे
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या शेवटच्या टप्प्यात आंदोलने, सभा व मोर्चे सुरू झाले. पण भारत सरकारने या चळवळीकडे दुर्लक्ष केले. या चळवळीला मोरारजी देसाई, स. का. पाटील यांनी सुरुवातीपासून विरोध केला. परंतु जनतेच्या रेट्याने हे आंदोलन यशस्वी करण्यात आले. काँग्रेस वर्कींग कमिटीने त्रिराज्य योजना मांडली. याला संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र विरोध सुरू झाला. १८ नोव्हेंबर १९५५ रोजी मुख्यमंत्री मोरारजी देसाई त्रिराज्य योजना मंजुरीसाठी विधानसभेत मांडणार होते. त्या विरोधात सेनापती बापट यांनी प्रचंड मोठा मोर्चा विधानसभेवर काढला. त्याच दिवशी सायंकाळी कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांनी ५० हजार लोकांची सभा मुंबईत कामगार मैदानात घेतली व त्रिराज्य कल्पना फेटाळली व २१ नोव्हेंबर १९५५ रोजी मोरारजी देसाई व स. का. पाटील यांनी मुंबईच्या चौपाटीवर सभा घेतली व त्यावेळी लोकांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. परंतु मोरारजी देसाई यांनी हिंसक मार्गांचा वापर केल्यास मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, असे सांगितले. स. का. पाटील यांनी आकाशात चंद्र तारे आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रालाही मिळणार नाही अशी घोषणा केली. परिणामी चप्पल, दगड, गोटे यांचा मारा करून त्यांची ही सभा लोकांनी उधळून लावली. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी आंदोलकांनी कामगारांचा संप घडवून आणला. लोक ओव्हल मैदानावर जमू लागले. त्यावेळी मोरारजी देसाई सरकारने जमावबंदी आदेश मांडला. आदेशभंग केल्याबद्दल पोलिसांनी प्रथम लाठीमार केला. अश्रूधूर सोडला. नंतर जमावावर गोळीबार केला. त्यात १५ आंदोलक हुतात्मा झाले व सुमारे ३०० लोक जखमी झाले. ४०० पेक्षा जास्त लोकांना अटक झाली.
१९६२ : भारत-चीन युद्धाला पूर्णविराम
२० ऑक्टोबर १९६२ रोजी भारत आणि चीनमध्ये युद्ध सुरू झाले. चीनने भारतीय भूभागावर कब्जा केल्याच्या दाव्यानंतर दोन्ही देशांचे लष्कर आमनेसामने आले होते. महिनाभर चाललेल्या या युद्धात भारताच्या ११-१२ हजार सैनिकांचा मुकाबला करण्यासाठी चीनने ८० हजारांहून अधिक सैनिक उतरवले होते. पूर्ण महिन्यानंतर २० नोव्हेंबर रोजी चीनने युद्धविराम घोषित केला. तसेच वादग्रस्त भागातून माघार घेण्याचे मान्य केले. यानंतर २१ नोव्हेंबर १९६२ रोजी युद्ध संपले. या युद्धात भारताचे १ हजार ३८३ जवान शहीद झाले तर ७२२ चिनी सैनिक मारले गेले.