६ डिसेंबर, आज महापरिनिर्वाण दिन

yongistan
By - YNG ONLINE
१९५६ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक क्रांतीचे नेतृत्व करणारे प्रमुख योद्धे, अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित अशा बहुआयामी ओळख असणारे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अर्थात बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी बाबासाहेब आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला. अस्पृश्यता पाळली जात असताना सामाजिक विषमतेला तोंड देत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांनी देशासाठी केलेल्या भरीव कार्यामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटले जाते. 
बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या. तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत काम केले. महाडच्या चवदार सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्यता विरोधी लढ्याचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली. 
बाबासाहेब आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई विद्यार्थी होते. भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले होते. 
स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणा आणि अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला प्राथमिकता दिली.  बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिश सरकारमध्ये मजूर मंत्री होते. 
बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांचा पहिला संप झाला. हा संप १९२८-१९३४ या कालावधीत चरी (रायगड जिल्हा) या गावात झाला. हा संप सात वर्ष सुरू होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठीसुद्धा संघर्ष केला. १७ सप्टेंबर १९३७ रोजी खोती पद्धत नष्ट करणा-या कायद्याचे विधेयक बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळात मांडले. 
अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्यावतीने १९४६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय,१९५० मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, १९५३ मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर १९५६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सुरू केले आणि १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याच्या दोन महिन्याच्या आत त्यांचे महापरिनिर्वाण झाले. 
बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता आदी पाक्षिके, वृत्तपत्रे सुरू केली होती. त्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांचे प्रश्न उचलून धरले. 
१९७६ : क्रांतिसिंह नाना पाटील यांचे निधन 
क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचे राजकीय नेते होते.  त्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने सांगली सातारा या परिसरामध्ये होते. ब्रिटिशांच्या अन्याय कारक राजवटीस आव्हान देण्यासाठी प्रतिसरकार स्थापन केले. यातून त्यांनी महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीला मोठे योगदान दिले. १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. भूमिगत राहून त्यांनी प्रतिसरकारचे काम केले. तत्पूर्वी ते १९२०  ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिंिसह ब्रिटिशांना सापडले नाहीत. क्रांती सिंह नाना पाटील यांच्यावर र महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.


१९९२ : अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली;  उसळलेल्या दंगलीत सुमारे १५०० हून लोक ठार 
देशाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या घटनांपैकी एक असलेल्या बाबरी मशिदीचा विध्वंस ६ डिसेंबर १९९२ रोजी करण्यात आला. प्रभू श्रीरामाच्या जन्मठिकाणी ही मशीद बांधल्याचा दावा करत कारसेवकांनी बाबरी मशिदीचा विध्वंस केला. या घटनेनंतर देशाच्या राजकारणाची दिशा बदलली.