समाजशास्त्रज्ञ डॉ. अभय बंग

yongistan
By - YNG ONLINE
गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्च संस्थेमार्फत वैद्यकीय सेवा आणि संशोधन करणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून डॉ. अभय बंग यांची ओळख आहे. त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी चळवळ चालवली. तसेच नवजात बालकांच्या मृत्यूच्या कारणाचा अभ्यास करतानाच उपाययोजनाही मांडल्या. तसेच स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नावरील संशोधनही केले. गांधीजी, लोक आणि विज्ञान या डॉ. बंग यांच्या प्रेरणा आहेत.

डॉ. अभय बंग यांचा जन्म गांधीवादी कार्यकर्त्याच्या घरी २३ सप्टेंबर १९५० रोजी झाला. ठाकूरदास बंग आणि सुमन बंग हे त्यांचे आई-वडील. त्यांचे बालपण वर्ध्याच्या सेवाग्रामच्या आश्रमात गेले. नागपूर मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी घेतल्यानंतर त्यांनी पीजीआय या संस्थेत काम केले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून मास्टर्स ईन पब्लिक हेल्थ ही पदवी मिळविली. तेथे कार्ल टेलर यांच्याकडून सार्वजनिक आरोग्याचे धडे घेतले.  तेथे त्यांना मोठ्या नोकरीच्या संधी आल्या होत्या. पण आरामशील जीवनशैली नाकारून गडचिरोलीसारख्या दुर्लक्षित भागाला आपले कार्यक्षेत्र निवडले.  

डॉ. अभय बंग आणि पत्नी राणी बंग यांचा प्रेमविवाह आहे. ते नागपूरला कॉलेजला एकत्र शिकायला होते. डॉ. झाल्यावर वर्ध्याजवळ कान्हापूर, महाकाळ येथे वैद्यकीय काम सुरू केले. वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून समाज परिवर्तन हे त्यांचे ध्येय होते. त्यांनी या माध्यमातून समाजसेवा सुरू केली. दरम्यान, डॉ. अभय बंग यांचे सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे त्यांचे कार्य आहे. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारतासोबतच अनेक देशांनी घेतली असून पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश व अनेक आफ्रिकन देश त्यानी तयार केलेले बालमृत्यू नियंत्रणाचे मॉडेल वापरतात. डॉ. अभय बंग यांनी ब्रेथ काऊंटर नावाच्या उपकरणाचा शोध लावला. गडचिरोली जिल्ह्याच्या कुपोषण व नवजात अर्भकाच्या मृत्यूवर डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी कोवळी पानगळ नावाचा शोधनिबंध लिहिला. तो खूप गाजला होता. यामुळे देशाच्याच शासनाला नव्हे, तर जागतिक आरोग्य संघटनेलाही आरोग्यविषयी धोरण बदलावे लागले होते. 

डॉ. अभय बंग यांनी गडचिरोलीमध्ये दारूबंदी चळवळ चालवली होती. १९८८ मध्ये सुरू केलेल्या एका महिला जागरण यात्रेत एका स्त्रीने दारूच्या समस्येबद्दल लक्ष वेधले. त्याबरोबर इतर स्त्रियांनीही त्यांच्या नव-याच्या दारू पिण्यामुळे होणारे त्रास सांगितले आणि या समस्येवर काय करता येईल, यावर अभय बंग आणि इतर सर्वांनी विचार केला. यावर १०४ गावांमध्ये एक अभ्यास करण्यात आला. यात दारूच्या अर्थशास्त्राविषयी माहिती जमवण्यात आली. गडचिरोलीतील अनेक स्वयंसेवी संघटना एकत्र आल्या आणि यांनी गडचिरोली जिल्हा दारूमुक्त करा अशी मागणी सुरू केली. यासाठी एक दारूमुक्ती संघटना स्थापन करण्यात आली. जिल्ह्यातील तीन आमदारांनी यास पाठिंबा दिला. या काळात अभय आणि राणी बंग यांनी मोठ्या संघर्षाला तोंड दिले. 

रोजगार हमी योजनेतील किमान मजुरीचा दरामागाचा शास्त्रीय अभ्यास केल्यावर तो दर ४ रुपये नसून १२ रुपये आहे असा निष्कर्ष अभय बंगानी मांडला आणि तो इतका मुद्देसूद होता की सरकारला तो मान्य करावा लागला.  गांधीजी, लोक आणि विज्ञान या अभय बंगांच्या तीन महत्त्वाच्या प्रेरणा आहेत. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील शिक्षक कार्ल टेलर यांचाही अभय बंगांवर प्रभाव आहे. डॉ. अभय बंग यांना २००३ महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्याशिवाय २०१८ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.