पुण्याचा शिवराज राक्षेठरला महाराष्ट्र केसरी

yongistan
By - YNG ONLINE
धाराशिव : प्रतिनिधी
राज्य विजेतेपद कुस्ती स्पर्धेत मूळचा पुण्याचा शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला. शरद पवार आश्रयदाते असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या राज्य विजेतेपद कुस्तीत शिवराज सलग दुस-यांदा महाराष्ट्र केसरी ठरला. त्याने किताबाच्या कुस्तीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा ६-० असा सहा गुणांच्या फरकाने पराभव केला. धाराशिव येथे दि. २० नोव्हेंबर २०२३ रोजी ६५ महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली.
धाराशिव येथे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, जिल्हा तालिम संघ व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षेला ६५ वा महाराष्ट्र केसरी किताब व महिंद्रा स्कॉर्पिओ आणि मोहोळ घराण्याकडून परंपरेने चालत आलेली चांदीची गदा देण्यात आली तर उपमहाराष्ट्र केसरी नाशिकचा हर्षवर्धन सदगीर याला महिंद्रा ५७५ डीआय व लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ या वर्षीपासून दिली जाणारी चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले.
शिवराज आणि हर्षवर्धन हे दोघेही काका पवारांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचे पैलवान आहेत. त्यातही शिवराज राक्षे हा मूळचा पुण्याच्या खेड तालुक्यातील राक्षेवाडीचा पैलवान आहे. रामदास तडस अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या राज्य विजेतेपद स्पर्धेत शिवराजला महाराष्ट्र केसरी किताबाच्या कुस्तीत सिकंदर शेखकडून २८ सेकंदात हार स्वीकारावी लागली होती. मात्र, धाराशिव येथील कुस्ती स्पर्धेत त्याने महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब पटकावला.
       या स्पर्धेचे आयोजक सुधीर पाटील व मुख्य कार्यवाहक अभिराम पाटील यांच्या वतीने धाराशिव येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलावरील गुरुवर्य के. टी. पाटील क्रीडा नगरीत १६ ते २० नोव्हेंबरदरम्यान ६५ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा रंगली. आज रुस्तुम-ए-हिंद हश्चिचंद्र बिराजदार आखाड्यात रंगलेल्या चुरशीच्या लढतीत शिवराज राक्षेने मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला.