अहमदाबाद : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत (२०२३) पहिल्या दहा सामन्यांत भारतीय फलंदाजांनी विजयी घोडदौड कायम ठेवली, परंतु अंतिम शर्यतीत त्यांची बैलगाडी झाली. कारण त्यांना अवघ्या २४० धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान ७ गडी राखून पार केले आणि अजिंक्यपदाचा षटकार ठोकला. त्यामुळे विश्वकरंडक जिंकण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा धुळीस मिळाले. यासोबतच कोट्यवधी भारतीय क्रिकेटरसिकांचा स्वप्नभंग झाला. दि. १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात भारताला दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे तिस-यांदा विश्वविजेतपद पटकावण्याच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला.
अंतिम सामन्याचे दडपण प्रामुख्याने फलंदाजांना पेलवले नाही. मानसिकता तेथेच कमकुवत झाली. अक्षरश: धावांसाठी झगडावे लागले. पहिल्या १० षटकांत दोन बाद ८० आणि नंतरच्या ४० षटकांत ८ बाद १६० अशी अवस्था झाली. तेथेच ८० टक्के सामना गमावला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिलेदार ट्रॅव्हिस हेडने शतकी खेळी साकार करून दोन्ही संघातला फरक स्पष्ट केला.
विश्वकरंडक स्पर्धा सुरू झाल्यापासून भारतीय संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्वच आघाड्यांवर जोरदार कामगिरी करून तमाम क्रीडारसिकांच्या आशा उंचावल्या होत्या. भारतीय संघ २०११ नंतर यंदा पुन्हा एकदा विजेतेपदाचा करंडक जिंकणार, असा विश्वास वाटू लागला होता. मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी भारतीय संघाला लयच सापडू दिली नाही.
घाई अंगाशी
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली व भारताला फलंदाजीला बोलावले. सावध सुरुवात करणा-या रोहित शर्माने मॅक्सवेलच्या षटकात एक षटकार व एक चौकार मारून दहा धावा वसूल केल्या, तरीही पुढच्या चेंडूवर पुढे सरसावत मोठा फटका मारण्याच्या मोहात तो बाद झाला. पाठोपाठ श्रेयस अय्यरही माघारी फिरला. पाच चेंडूत भारताने हे दोन फलंदाज गमावले. तेथेच भारतीय फलंदाजीची गाडी चिखलात रुतली. ती विराट कोहली आणि राहुल यांनी बाहेर काढली खरी, परंतु अपेक्षांच्या ओझ्याखाली तिची चाके निखळली.
विराट मॅन ऑफ द टुर्नामेंट
भारताचा फलंदाज विराट कोहली या स्पर्धेचा मालिकावीर ठरला. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक ७६५ धावा केल्या. विराटने या स्पर्धेत खेळलेल्या ११ डावांमध्ये ७६५ धावा केल्या. अंतिम सामन्यात त्याने ५४ धावा केल्या होत्या. मात्र, भारतीय संघ विजयी होऊ शकला नसल्याने विराट कोहलीच्या डोळ््यात अश्रू तरळले होते. आयसीसी स्पर्धांमध्ये ३ वेळा 'मॅन ऑफ द टुर्नामेंट' पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू बनला.
सहाव्यांदा विश्वविजेतेपद
भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. ऑस्ट्रेलियाने याआधी १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५ मध्ये विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. ऑस्ट्रेलिया विश्वचषकातील सर्वांत यशस्वी संघ आहे. ऑस्ट्रेलिया विश्वविजेता ठरल्याने त्यांना ३३.३३ कोटींचे बक्षीस, तर भारत उपविजेता ठरल्याने त्यांना १६.६५ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. याशिवाय दोन्ही संघांना साखळी स्पर्धेतील सामने खेळण्यासाठीचेही पैसे दिले.