नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला २२ वर्षे पूर्ण झाल्याच्या कटू आठवणीदिवशीच दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी संसदेच्या सुरक्षेत अक्षम्य चूक घडली. यावेळी दोन तरुणांनी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत प्रवेश मिळवत शून्य प्रहरात कामकाज सुरू असताना त्यांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी घेतली. त्यावेळी त्यांनी रंगीत धुराच्या नळकांड्या फोडल्याने सभागृहात धूर पसरताच एकच हल्लकल्लोळ झाला. यावेळी खासदार आणि सुरक्षा रक्षकांनी या दोघांना पकडले. दुसरीकडे संसदेबाहेरही तानाशाही नहीं चलेगी अशी घोषणाबाजी करत लातूरच्या अमोल शिंदे आणि हरियाणाच्या ४२ वर्षीय नीलम सिंग हिने रंगीत नळकांड्या फोडत खळबळ उडवून दिली. नेमके १३ डिसेंबर रोजीच तरुणांनी सुरक्षा भेदून धुडगूस घातल्याने संसदेच्या कडेकोट बंदोबस्तावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. दरम्यान, या प्रकरणी या चौघांनाही अटक केली आहे.
ज्या दोन तरुणांनी लोकसभेच्या सभागृहात गोंधळ घातला, त्यांची नावे सागर शर्मा आणि मनोरंजन गौडा अशी आहेत. यातील सागर हा लखनौच्या अलामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामनगर येथील रहिवासी आहे तर मनोरंजन कर्नाटकातील म्हैसूरचा रहिवासी आहे. यासोबतच संसदेबाहेर स्मोक स्कँडल फोडणारा अमोल शिंदे लातूर जिल्ह्यातील झरी (ता. चाकूर) येथील रहिवासी तर नीलम सिंग ही हरियाणातील हिसारची रहिवासी आहे. या चौघांनाही पोलिसांनी अटक केली असून, त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. यासोबतच यांच्यासोबत असलेले आणखी दोघेजण फरार झाले. दरम्यान, पाचव्या व्यक्तीलाही अटक केल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी तात्काळ चौकशी सुरू झाली.
दोन घुसखोरांकडे होते धुराचे कॅन
यासंदर्भात पोलिसांनी माहिती देताना ज्या दोन घुसखोरांना पकडले, त्यांनी पिवळ््या रंगाच्या धुराचे कॅन आणले होते. या कॅनमध्ये पिवळ््या रंगाचा फ्लोरोसंट धूर होता. तसेच दोघे जण संसदेबाहेर सरकारविरोधात घोषणाबाजी करीत होते. त्यांच्याही हातात पिवळ््या रंगाचा गॅस असलेले कॅन होते, असे सांगितले.
कटातील ६ जण सोशल मीडियातून संपर्कात!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व आरोपी एकमेकांना आधीपासून ओळखत होते. संसदेतील आणि संसदेबाहेरच्या लोकांचा उद्देश एकच होता. हे सर्व आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते, अशी माहिती मिळत आहे. या सर्वांचा सूनियोजीत प्लान होता. यावरून संसदेच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, यासंबंधी सुरक्षा कर्मचा-यांसह ८ कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे.
संसदेवरील दहशतवादी
हल्ल्याला २२ वर्षे पूर्ण
१३ डिसेंबर २००१ हा भारतीय इतिहासातील काळा दिवस मानला जातो. या दिवशी पाकिस्तानमधून आलेल्या ५ दहशतवाद्यांनी लोकशाहीचे केंद्र असलेल्या भारतीय संसदेवर हल्ला केला होता. या हल्ल्यात दिल्ली पोलिसांसह ९ जण शहीद झाले होते. संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच दहशतवादी एके-४७ रायफलसह एका पांढ-या अॅम्बेसेडर कारमधून संसद भवनाच्या परिसरात घुसले होते. त्यांनी लष्करी गणवेश परिधान केला होता. त्यांनी गोळीबार सुरू करताच संसदेतील अलार्म वाजला. मुख्य इमारतीचे सर्व प्रवेशद्वार बंद केले गेले. संसदेत तैनात जवानांनी चहूबाजूंनी दहशतवाद्यांना घेरले. त्यानंतर जवळजवळ अर्धा तास दोन्ही बाजूने गोळीबार केला गेला. त्यानंतर भारतीय जवानांनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला. आजच्या घटनेने या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.