संसदेच्या हिवाळी अधिवेशनात १४ खासदार निलंबित

yongistan
By - YNG ONLINE

दिल्ली : वृत्तसंस्था
संसदेवरील हल्ल्याला २२ वर्षे पूर्ण झालेले असतानाच त्याच दिवशी म्हणजे बुधवार, दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी संसदेची सुरक्षा भेदून दोन तरुण लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत पोहोचले आणि तेथून त्यांनी थेट सभागृहात उडी घेतली, तर दोघे जण संसदेबाहेर सरकारविरोधात घोषणाबाजी करीत रंगीत धुराच्या नळकांड्या फोडल्या. या कारणावरून गुरुवार, दि. १४ डिसेंबर रोजी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी दोन्ही सभागृहांत सुरक्षेच्या कारणावरून आक्रमक पवित्रा घेत यासंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांनी सविस्तर निवेदन करावे, अशी मागणी लावून धरली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. त्यावर सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणल्याचे कारण पुढे करीत १४ खासदारांना उर्वरित अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले. यामध्ये काँग्रेसच्या लोकसभेतील ९, सीपीआय २, डीएमके १ आणि एका सीपीएम खासदाराचा समावेश आहे. यासोबतच तृणमूल कॉंग्रेसच्या राज्यसभेतील एका खासदारांनाही याच मुद्यावरून निलंबित करण्यात आले. प्रथम १५ खासदारांना निलंबित केले होते. पण एक खासदार  अनुपस्थित असताना निलंबित केले. हे लक्षात येताच द्रमुकचे खासदार एसआर पार्थिबन यांचे निलंबन मागे घेतले. 
संसदेत काल घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे. त्यामुळे संसदेतील सुरक्षेबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत सविस्तर निवेदन दिले पाहिजे आणि त्यावर सविस्तर चर्चा व्हायला हवी. यासोबतच घुसखोरांना व्हिजिटर पास उपलब्ध करून देणा-या भाजप खासदार प्रताप सिंहा यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या लावून धरत विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेतही आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज वेळोवेळी तहकूब करावे लागले. त्यातच सभागृहाच्या कामकाजात अडथळा होत असल्याचे कारण पुढे करीत लोकसभा आणि राज्यसभेच्या सभापतींनी खासदारांवर कारवाई करीत उर्वरित हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित केले. त्यावरून विरोधक आक्रमक झाल्याने गदारोळ झाला.
 
लोकसभेचे १३, राज्यसभेचा १ खासदार निलंबित
लोकसभा : टीएन प्रथापन (काँग्रेस), हीबी एडेन (काँगेस), जोथिमनी (काँग्रेस), राम्या हरिदास (काँग्रेस), डीन कुरियाकोस (काँगेस), बेनी बेहनन (काँग्रेस), व्ही. के. श्रीकंदन (काँग्रेस), मोहम्मद जावेद (काँग्रेस), मणिकम टैगोर (काँग्रेस), पीआर नटराजन (माकप), एस वेंकटेशन (माकप), कनिमोई करुणानिधी (द्रमुक), के सुब्रमण्यन (सीपीआय) राज्यसभा खासदार : डेरेक ओब्रायान (तृणमूल कॉंग्रेस)
हजर नसताना द्रमुकच्या खासदारावर कारवाई
आज १५ खासदार निलंबित केले होते. यामध्ये १ राज्यसभेचा तर १४ खासदार लोकसभेचे होते. धक्कादायक बाब म्हणजे कारवाई केलेले डीएमकेचे खासदार एसआर पार्थिबन सभागृहात हजर नव्हते. तरीही त्यांना निलंबित केले. हे लक्षात येताच त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले.
सुरक्षाभंग प्रकरणी ८ कर्मचारी निलंबित
संसदेतील सुरक्षाभंग प्रकरणी लोकसभा सचिवालयाने कठोर कारवाई केली आहे. बुधवारी झालेल्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी लोकसभा सचिवालयाने ८ कर्मचा-यांना निलंबित केले आहे. या सर्व सुरक्षा कर्मचा-यांना निष्काळजीपणामुळे निलंबित करण्यात आल्याचे समजते. रामपाल, अरविंद, वीर दास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित आणि नरेंद्र अशी लोकसभा सचिवालयाने निलंबित केलेल्यांची नावे आहेत.