१३ डिसेंबर : संसदेवर हल्ला, स्मिता पाटील स्मृती दिन

yongistan
By - YNG ONLINE
१९८६: अभिनेत्री स्मिता पाटील यांचे निधन : अभिनेत्री स्मिता पाटीलचा जन्म पुण्यात झाला. तिचे वडील शिवाजीराव पाटील हे राजकारणी आणि समाजवादी विचारांचे तर आई विद्याताई पाटील या समाजसुधारक होत्या. स्मिताने तिच्या रुपेरी पडद्यावरील करियरमध्ये अनेक समांतर चित्रपटांत काम केले. महिलांच्या समस्येवर स्मिता नेहमीच आवाज उठवायची. स्मिता पाटील ही दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका होती. त्यानंतर तिने चित्रपट, रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. भारतीय सिनेसृष्टीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत तिचे नाव अग्रक्रमी आहे. स्मिताने तिच्या जेमतेम एक दशकभराच्या कारकिर्दीत ८० हून अधिक हिंदी, बंगाली, मराठी, गुजराती, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले होते. स्मिताने श्याम बेनेगल यांच्या श्याम बेनेगल यांच्याचरणदास चोर (१९७५) चित्रपटातून पदार्पण केले होते. स्मिता पाटील ही समांतर चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून नावारुपास आली. मंथन, भूमिका, आक्रोश, चक्र, निशांत, वारीस, अर्थ,  मिर्च मसाला, आज, नजराणा या चित्रपटातील भूमिकांनी तिने रसिकांच्या मनावर वेगळीच छाप उमटवली. तसेच सामना, जैत रे जैत, राजा शिव छत्रपती, उंबरठा या सारख्या मराठी चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची उंची दाखवली. चित्रपट सृष्टीतील योगदानामुळे तिला १९८५ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्मिता पाटीलचा विवाह अभिनेता राज बब्बरशी झाला होता. १३ डिसेंबर १९८६ रोजी वयाच्या ३१ व्या वर्षी बाळंतपणाच्या गुंतागुंतीमुळे तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिचे दहाहून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले. २००१ :  भारताच्या संसदेवर दहशतवादी हल्ला : जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तोयबाच्या पाच पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. या हल्ल्याने जगभरात खळबळ उडाली. याच दिवशी गृह मंत्रालय आणि संसदेचे लेबल असलेल्या कारमधून पाच अतिरेक्यांनी संसदेच्या सभागृहात प्रवेश केला. या हल्ल्याच्या आधी राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्यावेळी संसदेत अनेक खासदारांसह गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी आणि इतर मंत्री अधिकारी संसदेच्या इमारतीत होते. प्रमुख राजकारण्यांसह १०० हून अधिक लोक त्यावेळी संसद भवनात होते. बंदूकधा-यांनी कारवर बनावट ओळख स्टिकर वापरला आणि अशा प्रकारे संसद भवनाच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था भंग केली. दहशतवाद्यांनी अचानकपणे गोळीबार सुरू केला. त्याच्या प्रत्युत्तरात सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दिल्ली पोलीस कर्मचारी, संसद सुरक्षा कर्मचारी आणि संसद भवन परिसरातील माळी इतर एका कर्मचा-याचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर अनेक संशयितांना अटक करण्यात आली आणि डिसेंबर २००२ मध्ये जैश-ए-मोहम्मदच्या चार सदस्यांना हल्ल्यातील भूमिकांसाठी दोषी ठरवण्यात आले. २००३ मध्ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) ने जैश-ए-मोहम्मदचा कमांडर-इन-चीफ आणि हल्ल्याचा मास्टरमाईंड, श्रीनगर, जम्मू आणि काश्मीरच्या नूर बाग शेजारील गाझी बाबा याला ठार केले.