एकाच वेळी ४ लक्ष्य भेदणारे आकाश क्षेपणास्त्र

yongistan
By - YNG ONLINE
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आपल्या स्वदेशी शस्त्रास्त्र प्रणालींची निर्यात करण्यास उत्सुक असलेल्या भारताने मोठी मजल मारली आहे. नुकत्याच झालेल्या अस्त्रशक्ती २०२३ सरावादरम्यान एकाच फायरिंग युनिटने एकाच वेळी चार मानवरहित लक्ष्ये नष्ट केली. एकाच फायरिंग युनिटचा वापर करून कमांड मार्गदर्शनाद्वारे एकाच वेळी चार लक्ष्य नष्ट करण्याची क्षमता असलेला भारत हा पहिला देश ठरला आहे. डीआरडीओने (संरक्षण संशोधन आणि विकास संघटना) रविवार, दि. १७ डिसेंबर २०२३ रोजी आकाश क्षेपणास्त्राच्या सामर्थ्यांची माहिती दिली.
डीआरडीओने दाखवून दिले की, आकाशमध्ये एकाच वेळी चार लक्ष्ये नष्ट करण्याची ताकद भारतात आहे. आकाश क्षेपणास्त्रात २५ किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. अचूक हवाई लक्ष्य करण्याच्या शक्तीने सुसज्ज असलेल्या आकाश क्षेपणास्त्र प्रणालीची गणना अत्याधुनिक शस्त्रास्त्रांमध्ये केली जाईल, असे डिआरडीओने म्हटले आहे. भारत हा जगातील पहिला देश आहे, ज्याकडे आकाश क्षेपणास्त्रसारखे तंत्रज्ञान आणि शक्ती आहे. डीआरडीओच्या मते, एकाच फायरिंग युनिटचा वापर करून क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करण्यात आणि एकाच वेळी चार लक्ष्यावर मारा करण्याची क्षमता असलेल्या देशांमध्ये भारत आघाडीवर आहे. जगातील इतर कोणत्याही देशात सध्या अशी क्षमता नाही.
आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा फायरिंग लेव्हल रडार, फायरिंग कंट्रोल सेंटर आणि दोन आकाश एअर फोर्स लॉन्चसह तैनात करण्यात आली होती. हे प्रक्षेपक ५ क्षेपणास्त्रांनी सुसज्ज होते. या सरावादरम्यान, प्रथम एफएलआरने हवेतील शत्रूंचा शोध घेतला आणि नंतर आकाश फायरिंग युनिटने हवेतच ते लक्ष्य नष्ट करण्याचे आदेश दिले. यानंतर कमांडरकडून आदेश जारी करण्यात आला, त्यानंतर दोन आकाश क्षेपणास्त्रांनी दोन प्रक्षेपकांमधून हवेत उड्डाण केले. त्याच वेळी त्याच लाँचरमधून उर्वरित दोन लक्ष्ये उडविण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर एकूण ४ क्षेपणास्त्रांनी २५ किमी अंतरावरील चारही लक्ष्ये नष्ट केली.