जन धन योजनेची १० कोटी खाती निष्क्रिय

yongistan
By - YNG ONLINE
 

-५१ कोटी भारतीयांची खाती उघडली
-१२ हजार कोटींची रक्कम शिल्लक
-२०१४ मध्ये सुरु झालेली जनधन योजना

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्व सामान्य नागरिकांपर्यंत बँंिकग सेवा पोहोचवण्यासाठी जनधन योजना सुरू केली होती. या योजनेच्या अंतर्गत ५१ कोटी भारतीयांची खाती उघडण्यात आली होती. यापैकी १० कोटी खाती निष्क्रिय झाली आहेत. म्हणजेच या खात्यांवर कसलाही व्यवहार होत नसल्याची माहिती आहे. या १० कोटी खात्यांमध्ये १२ हजार कोटी रुपयांची रक्कम जमा आहे. या खात्यामधील रक्कम घेणारे देखील कोणी नसल्याची माहिती आहे.

जनधन योजनेमुळे डीबीटी पद्धतीने सरकारी योजनांचे लाभ संबधित व्यक्तीपर्यंत पोहोवण्यासाठी फायदा झाला होता. गरीब व्यक्तींना बँकिंग सुविधा उपलबध करून देण्यात या योजनेचा मोठा वाटा होता. ही योजना २०१४ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेद्वारे गरीब लोकांची खाती उघडण्यात आली होती.

१० कोटी जनधन खाती बंद का?
एका रिपोर्टनुसार १० कोटी जन धन खात्यांमध्ये १२७७९ कोटी रुपये शिल्लक आहेत. यापैकी ४.९३ कोटी खाती महिलांची आहेत. रिपोर्टनुसार देशात ५१.११ कोटी जन धन खाती आहेत. ही खाती बंद होण्यास अनेक कारणं आहेत. याचा खातेधारकांशी कसलाही संबंध नाही. काही महिने या खात्यांवर व्यवहार न झाल्याने खाती बंद आहेत. आरबीआयच्या निर्देशानुसार एखाद्या खात्यात दोन वर्ष व्यवहार न झाल्यास बचत आणि चालू खाते निष्क्रिय मानले जाते. बँका या निष्क्रिय खात्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. जन धन खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागत नाही.