पंतप्रधान मोदींना पत्र लिहून विनेश फोगटने केली घोषणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय कुस्तीमध्ये सुरू असलेला वाद काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. कुस्ती महासंघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही तासात साक्षी मलिकने निवृत्ती जाहीर केली होती. साक्षीने २०१६ साली रिओ ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकले होते. त्याच्या दुस-या दिवशी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणा-या बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. त्यानंतर आता महिला कुस्तीपटू विनेश फोगटने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याची घोषणा दि. २६ डिसेंबर २०२३ रोजी केली. त्यामुळे केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत कुस्तीपटूंमध्ये किती रोष आहे, याचा अंदाज येतो.
विनेशने पंतप्रधान मोदींना लिहलेले पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यात तिने मला देण्यात आलेला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार परत करत आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांचे खूप-खूप आभार, असे म्हटले. मला आठवते की, २०१६ साली जेव्हा साक्षी मलिक ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून आली होती, तेव्हा तुमच्या सरकारने तिला बेटी बचाओ बेटी पढाओचे ब्रँड अॅम्बेसडर केले होते. आज जेव्हा साक्षीवर कुस्ती सोडण्याची वेळ आली, तेव्हा मला २०१६ ची आठवण होत आहे. आम्ही महिला खेळाडू फक्त सरकारच्या जाहिरातींवर प्रसिद्ध होण्यासाठी आहोत का, असा सवाल पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केला.
कुस्तीपटू विनेशला २०१६ साली अर्जुन पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर २०२० साली तिला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला. खेल रत्न हा भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्याच्या वेळी विनेशला दुखापत होती आणि ती व्हिलचेअरवरून पुरस्कार घेण्यासाठी आली होती.
विनेशने देशासाठी
ही पदके जिंकली
२९ वर्षीय विनेशने ऑलिम्पिक पदक जिंकले नसले तरी तिने देशासाठी वर्ल्ड चॅम्पियशिपमध्ये दोन पदके जिंकली आहेत. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये एक सुवर्ण आणि एक रौप्य या शिवाय राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ३ सुवर्ण जिंकली आहेत. रिओ ऑलिम्पिकमध्ये विनेश पदकाची मोठी दावेदार मानली जात होती. पण गुढघ्याच्या दुखापतीमुळे तिला बाहेर व्हावे लागले. विनेश ही गीता आणि बबिता फोगट यांची चुलत बहीण आहे.