आपल्या देशाला कृषीप्रधान देश म्हणून ओळखले जाते. कारण शेती हाच आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पण सध्या देशातील शेतक-यांना सातत्याने विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. कधी आस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट येतात. याचा मोठा फटका शेतक-यांना बसत आहे. २३ डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीच्या दिवशी राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात येतो. परंतु शेतक-यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. एक तर शेतमालाला भाव नाही. भाव मिळायला लागला की आयात-निर्यात रोखून भाव पाडले जातात. पूर्ण वेळ वीज मिळत नाही. पुरेसे पाणी नाही. खत, बियाणे, कीटकनाशकांचे भाव गगनाला भिडलेले, पेट्रोल, डिझेलही महागलेले यामुळे उत्पन्न आणि खर्चात ताळमेळच जुळत नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
शेतकरी जगाचा पोशिंदा आहे असे म्हटले जाते. शेतकरी जगला तर देश जगेल असेही म्हटले जाते. मात्र, सध्याच्या काळात शेतक-यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. कधी त्याने पिकवलेल्या शेतमालाला दर नसतो, तर कधी नैसर्गिक संकटाच्या तडाख्यात त्याने पिकवलेले पिके उद्ध्वस्त होतात तर कधी पिकवलेल्या मालाला सरकारच्या धोरणाचा फटका बसतो. पेट्रोल, डिझेलचे वाढलेले दर आणि खते, बियाणे, किटकनाशकाचे आवाक्याबाहेरचे दर हेच शेतक-यांचे उत्पन्न आणि खर्चाचे गणित बिघडवतात. त्यामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.