२५ डिसेंबर : राष्ट्रीय सुशासन दिन, खिसमस

yongistan
By - YNG ONLINE

२५ डिसेंबर हा महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी ख्रिसमस अर्थात नाताळचा सण साजरा केला जातो. याशिवाय भारतात राष्ट्रीय सुशासन दिवस साजरा केला जातो. तसेच आजच्या दिवशी चार्ली चाप्लिन यांचे निधन झाले होते. याच दिवशी वर्ल्ड वाईड वेबची पहिली चाचणी झाली. याच दिवशी पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा वाढदिवस आहे.

ख्रिसमस : आज २५ डिसेंबर अर्थात ख्रिसमस. या दिवशी ख्रिस्ती बांधवांचे लाडके प्रभू येशू यांचा जन्म झाला होता. संपूर्ण जगभरात ख्रिसमस हा सण जल्लोषात साजरा केला जातो.  याला नाताळ असेही म्हटले जाते. महाराष्ट्रातील ख्रिस्ती लोक दिवाळीप्रमाणे या दिवशी करंज्या व अन्य खाद्यपदार्थांचे एकमेकांस आदान-प्रदान करतात. लहान मुलांना सांताक्लॉजच्या वेषात येऊन भेटवस्तू देतात. नाताळ हा शब्द नातूस म्हणजे जन्म या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ करतात.  ख्रिसमस ट्री हे स्वर्गातल्या ईडन बागेतील झाड व क्रूसाचे झाड यांचे प्रतीक असल्याची मान्यता आहे.

राष्ट्रीय सुशासन दिवस 
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिवशी प्रत्येक वर्षी भारतात गुड गव्हर्नन्स डे अर्थात सुशासन दिन साजरा केला जातो. २०१४ सालीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ प्रत्येक वर्षी २५ डिसेंबर रोजी गुड गवर्नेंस डे साजरा करण्याची घोषणा केली होती. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशातील  ग्वाल्हेरमध्ये झाला होता. ते तीन वेळा भारताचे पंतप्रधान झाले. १९९६ साली पहिल्यांदा तर १९९८-९९ मध्ये दुस-यांदा पंतप्रधान झाले तर १३ ऑक्टोबर १९९९ ला तिस-यांदा ते पंतप्रधान झाले. अटल बिहारी वाजपेयी हे संयुक्त राष्ट्र संघामध्ये हिंदीत भाषण देणारे पहिले नेते होते. त्यांचे हिंदीवर खूप प्रेम होते. २७ मार्च २०१५ ला त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

चार्ली चाप्लिन यांचे निधन 
आजच्याच दिवशी १९७७ मध्ये जगप्रसिद्ध अभिनेता चार्ली चाप्लिन यांचे निधन झाले. त्यांचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी लंडनमध्ये झाला होता. त्यांचे पूर्ण नाव चार्ल स्पेन्सर चॅपलिन होते. त्यांनी लहान वयातच नाटक आणि विनोदी कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. अवघ्या १९ व्या वर्षी एका अमेरिकन कंपनीने त्यांच्याशी करार केला आणि ते अमेरिकेला रवाना झाले. चार्ली चॅपलिन यांनी अमेरिकेत सिनेकारकीर्दीची सुरुवात केली. १९१८ सालापर्यंत ते जगातील ओळखीचा आणि लोकप्रिय चेहरा बनले. चार्ली यांनी अ वुमन ऑफ पॅरिस, द गोल्ड रश, द सर्कस, सिटी लाईट्स, मॉर्डन टाइम्स यांसारख्या प्रसिद्ध आणि यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. २५ डिसेंबर १९७७ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. परंतु मृत्यूच्या दोन महिन्यानंतर काही लोकांनी त्यांचा मृतदेह चोरला होता. खंडणीसाठी तो चोरला होता. 

मदन मोहन मालवीय यांचा जन्म 
आजच्याच दिवशी २५ डिसेंबर १८६१ रोजी स्वातंत्र्यसैनिक तसेच शिक्षणतज्ज्ञ मदन मोहन मालवीय यांचा जन्म अलाहाबाद येथे झाला. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली होती. मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. 

वर्ल्ड वाइड वेबची चाचणी 
आजच्याच दिवशी १९९० मध्ये वर्ल्ड वाइड वेबची (डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू) पहिली यशस्वी चाचणी झाली. अत्यंत साध्या पद्धतीचे हे वेब पेज पहिल्या दिवशी ज्याप्रमाणे होते, त्याचप्रकारे आजही आहे