४ जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत. महान भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ आयझॅक न्यूटन यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता. ब्रेल लिपीचे निर्माते लुई ब्रेल यांच्या जन्मदिनानिमित्त ४ जानेवारी हा जगभरात ब्रेल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्याच दिवशी पुण्यात केसरी वर्तमानपत्राची सुरुवात झाली होती.
१६४१ : चार्ल्सचा पराभव
इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स याला पराभवाचा सामना करावा लागला होता. कर भरायला नकार देणा-या लोकप्रतिनिधींना पकडण्यासाठी पहिला चार्ल्स हाऊस ऑफ कॉमन्समध्ये शिरला होता. या अभूतपूर्व घटनेची परिणती यादवी युद्धात झाली होती.
१६४३ : आयझॅक न्यूटनचा जन्म
महान भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ज्ञ आयझॅक न्यूटन यांचा आज जन्मदिन. इंग्लंडमधील लिंकनशायर शहरातील वुलस्टोर्प येथे न्यूटन यांचा जन्म झाला होता. न्यूटनने प्रकाश, गती आणि गणितात अनेक शोध लावले. पांढरा रंग इंद्रधनुष्यातील सात रंगांचे मिश्रण आहे, असे सांगितले. न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत मांडला. सूर्याच्या चारही बाजूंना फिरणा-या ग्रहांच्या संबंधात गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगितला. न्यूटन यांनी 17 व्या शतकात लावला पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणा-या वस्तूच्या विरुद्ध दिशेने असते. त्यामुळे वर फेकलेल्या वस्तूची गती कमी कमी होत जाते व शेवटी ती शुन्य होते, असे म्हटले. न्यूटनने गतीविषयक तीन नियम सांगितले होते.
१८०९ : लुई ब्रेल यांचा जन्म
ब्रेल लिपीचे निर्माते लुई ब्रेल यांचा आज जन्मदिन. लुई ब्रेल हे फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक होते. त्यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहाय्याने वाचनाची पद्धत, लिपी विकसित केली. त्यांचा जन्म ४ जानेवारी १८०९ रोजी फ्रान्समध्ये झाला होता. २०१९ पासून त्यांचा जन्मदिन जगभरात ब्रेल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक ब्रेल दिन हा अंध आणि दृष्टिबाधित व्यक्तींसाठी आणि त्यांच्या मानवी हक्कांची पूर्ण जाणीव करून देण्यासाठी साजरा होतो. ब्रेल यांच्या नावावरून ब्रेल लिपी अस्े म्हटले जाते.
१८८१ : केसरी वर्तमानपत्राची सुरुवात
लोकमान्य टिळक यांनी पुण्यात केसरी वर्तमानपत्राची सुरुवात केली होती. जनतेला स्वातंत्र्य चळवळीस उद्युक्त करण्यासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी टिळकांनी केसरी वर्तमानपत्र सुरू केले होते. केसरी वर्तमानपत्राचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर होते. त्यांनी १८८९ पर्यंत संपादक म्हणून काम पाहिले. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे केसरीची लोकप्रियता झटक्यात वाढली. परंतु पुढे टिळक व आगरकर यांच्यातील वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे केसरीचे काम लोकमान्य टिळक पाहू लागले. इंग्रज सरकारविरोधात टिळकांनी पाचशेपेक्षा जास्त अग्रलेख लिहिले होते. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? उजाडले पण सूर्य कुठे आहे? यासारख्या मथळ््यासह टिळकांचे संपादकीय प्रसिद्ध झाले.
१९२६ : काकोरी खटल्याला सुरुवात
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतही काकोरी घटनेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याच काकोरी खटल्याला आजच्याच दिवशी १९२६ मध्ये लखनौ येथे सुरुवात झाली होती. क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वात क्रांतिकारी पार्टीसाठी पैसा जमा करण्यासठी लखनौ जवळच्या काकोरी येथे सर्व क्रांतिकारक जमा झाले. ९ ऑगस्ट १९२५ च्या रात्री काकोरी आणि आलमनगर रेल्वे स्थानकादरम्यान सहारनपूर लखनौ एक्स्प्रेसमधील इंग्रजांचा सोने-चांदीचा खजिना लुटण्यात आला. अवघे दहा पंधरा क्रांतिकारक विरुद्ध इंग्रज असा सामना झाला होता. या काकोरी कटात सहभागी असल्यामुळे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने १९२७ मध्ये फाशी दिली होती.
१९३२ : पंडित जवाहरलाल नेहरू यांना अटक
सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांना दोन वर्षांची शिक्षा झाली. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळ सुरु झाली होती. १९३२ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे वाईसराय विलिंग्डन यांनी महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांना अटक केली होती.
१९९४ : संगीतकार आरडी बर्मन अर्थात पंचमदा यांचे निधन
आरडी बर्मन अर्थात पंचमदा यांचे आजच्याच दिवशी १९९४ मध्ये निधन झाले. ७०-८० च्या दशकात आरडी बर्मन यांनी बॉलीवूडमध्ये आपल्या संगीताने छाप सोडली. आरडी बर्मन यांची गाणी आजही प्रेक्षकांना आवडतात. आरडींनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी पहिले गाणं संगीतबद्ध केले होते आणि बॉलिवूडमध्ये १७ व्या वर्षी पाऊल टाकले होते. तिसरी मंजिल, अमर प्रेम, आंधी, परिचय, मासूम, शोले, खेल खेल में, आप की कसम, किनारा आणि १९४२ लव स्टोरी अशा सिनेमातील गाण्यांना संगीतबद्ध केले आहे.
१९१४ : साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मराठी कवियत्री इंदिरा संत यांचा जन्म.
१९४८ : ब्रम्हदेश (म्यानमार) देशाला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले.