कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न

yongistan
By - YNG ONLINE
१०० व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारची घोषणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. ठाकूर यांच्या १०० व्या जयंतीच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने हा सन्मान जाहीर केला. कर्पुरी ठाकूर हे मागासवर्गीयांच्या हिताचे समर्थन करण्यासाठी ओळखले जात होते. साधारणपणे केंद्र सरकार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कधी पद्म पुरस्कार तर कधी भारतरत्न जाहीर करते. यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या २ दिवस आधी भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. २४ जानेवारी रोजी कर्पूरी ठाकूर यांची जयंती आहे. त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे २३ जानेवारी २०२४ रोजी त्यांना मरणोत्तर भारतरत्नने गौरविण्याची घोषणा केली. जदयूची ब-याच वर्षांची ही मागणी आहे.
कर्पुरी ठाकूर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक, राजकारणी आणि बिहार राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि दोनदा मुख्यमंत्री होते. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना जननायक म्हटले गेले. कर्पुरी ठाकूर यांचा जन्म आताच्या कर्पूरग्राम येथे झाला होता. त्यांचे वडील गावातील अल्पभूधारक शेतकरी होते आणि त्यांच्या पारंपरिक व्यवसायात त्यांनी न्हावी म्हणून काम केले. भारत छोडो आंदोलनात त्यांनी २६ महिने तुरुंगात घालवले. २२  डिसेंबर १९७० ते २ जून १९७१ आणि २४ जून १९७७ ते २१ एप्रिल १९७९ या काळात त्यांनी दोनदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. कर्पुरी ठाकूर यांनी १९७७ मध्ये बिहारमधील सर्वात ज्येष्ठ नेते सत्येंद्र नारायण सिन्हा यांच्याकडून नेतेपदासाठी निवडणूक जिंकली आणि दोनदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. ठाकूर यांना भारतरत्न देण्यात यावे, यासाठी जेडीयूकडून मागणी करण्यात आली होती. कर्पूरी ठाकूर हे बिहारच्या राजकारणात सामाजिक न्यायाची ज्योत प्रज्वलित करणारे नेते मानले जातात. 
बिहारमध्ये समाजवादाचे राजकारण करणारे लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार हे कर्पूरी ठाकूर यांचे शिष्य आहेत. जनता पक्षाच्या काळात लालू आणि नितीश यांनी कर्पूरी ठाकूर यांचे बोट धरून राजकारणाच्या युक्त्या शिकल्या. अशा परिस्थितीत बिहारमध्ये लालू यादव सत्तेवर आल्यावर त्यांनी कर्पूरी ठाकूर यांचे काम पुढे नेले. त्याचबरोबर नितीशकुमार यांनीही अत्यंत मागासलेल्या समाजाच्या बाजूने अनेक गोष्टी केल्या. दरम्यान कर्पुरी ठाकूर यांची लोकप्रियता कायम आहे. मागास मतदारांत ते अधिक लोकप्रिय आहेत. श्रेयाच्या लढाईत आपली बाजू मजबूत कशी होईल, या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. नितीशकुमार यांनी उद्या सर्वत्र कार्यक्रम आयोजित केला होता. तत्पूर्वीच कपूर यांना भारतरत्न जाहीर करून त्यांचा गौरव वाढविला आहे. कर्पूरी ठाकूर यांचे १९८८ मध्ये निधन झाले, परंतु इतक्या वर्षांनंतरही ते बिहारच्या मागासलेल्या आणि अत्यंत मागासलेल्या मतदारांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
न्हावी कुटुंबात जन्म
कर्पूरी ठाकूर यांचा जन्म एका सामान्य न्हावी कुटुंबात झाला. त्यांनी आयुष्यभर काँग्रेसविरोधी भूमिका घेऊन बिहारच्या राजकारणात स्थान निर्माण केले, असे सांगण्यात येते. कर्पूरी ठाकूर १९७० आणि १९७७ मध्ये बिहारचे मुख्यमंत्री झाले. कर्पूरी ठाकूर १९७० मध्ये पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. २२ डिसेंबर १९७० रोजी त्यांनी पहिल्यांदा राज्याची सूत्रे हाती घेतली. त्यांचा पहिला टर्म केवळ १६३ दिवसांचा होता. १९७७ च्या जनता लाटेत जनता पक्षाला मोठा विजय मिळाला, तेव्हाही कर्पूरी ठाकूर दुस-यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले. तेव्हाही त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.