२४ जानेवारी : डाॅ. होमीभाभा यांचा स्मृती दिन

yongistan
By - YNG ONLINE

भारताच्या अणू संशोधन कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे, भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा जहांगीर यांचा २४ जानेवारी स्मृतीदिन आहे. त्याशिवाय ब्रिटनचे माजी पंतप्रधान नोबेल पुरस्कार विजेत विस्टन चर्चिल, स्वर भास्कर पंडित भीमसेन जोशी यांचाही स्मृतीदिन तर, मराठी अभिनेत्री हंसा वाडकर यांची जयंती आणि चित्रपट निर्माते सुभाष घई यांचा वाढदिवस. 

१९२४ : अभिनेत्री हंसा वाडकर यांचा जन्मदिवस
मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री हंसा वाडकर यांची जयंती. वयाच्या १३ व्या वर्षापासून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली. हंसा वाडकर यांचे मूळ नाव रतन साळगावकर होते. सांगत्ये ऐका, लोकशाहीर रामजोशी, विजयाची लग्ने, संतसखू, रामशास्त्री, आजाद, नवजीवन, धन्यवाद, मेरे लाल आदी चित्रपटांमध्ये अभिनय केला. सांगत्ये ऐका हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध.

१९४५ : सुभाष घई यांचा वाढदिवस
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, निर्माते, लेखक-पटकथाकार सुभाष घई यांचा वाढदिवस आहे. सुभाष घई यांनी दिग्दर्शित केलेले अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. विश्वनाथ, कालीचरण, हिरो, कर्मा, राम-लखन, कर्ज, परदेस, खलनायक, ताल, यादें, आदी गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले.

१९६५ : विस्टन चर्चिल यांचा स्मृतीदिन
दुस-या महायुद्धादरम्यानचे ब्रिटनचे पंतप्रधान असलेले विस्टन चर्चिल यांचा स्मृतीदिन. प्रभावी वक्ता आणि नेता म्हणून त्यांची प्रतिमा होती. त्यांना १९५३ मध्ये साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला होता. 

१९६६ : डॉ. होमी भाभा यांचा स्मृतीदिन
भारतीय अणू संशोधन कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे  डॉ. होमी भाभा यांचा स्मृतीदिन. भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांच्या पुढाकाराने अणू ऊर्जा आयोगाची स्थापना झाली. त्याचे प्रमुख म्हणून डॉ. भाभा यांनी जबाबदारी सांभाळली. अणू ऊर्जेचा वापर हा शांततेच्या मार्गाने व्हावा, अशी त्यांची ठाम भूमिका होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४८ साली त्यांनी पंतप्रधान नेहरुंच्या सहकार्याने अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. डॉ. भाभांचे अणुऊर्जेमधील संशोधन लक्षात घेता १९५५ साली त्यांना आंतरराष्ट्रीय अणुशक्ती परिषदेचे अध्यÞक्षपद देण्यात आले. डॉ. भाभांच्या प्रयत्नांमुळेच १९५६ साली ट्रॉम्बे येथे भारतातलीच नव्हे तर आशियातील पहिली अणुभट्टी अप्सरा उभारण्यात आली. त्यानंतर सायरस आणि झर्लीना या अणुभट्ट्याही उभारण्यात आल्या. एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले. डॉ. होमी भाभा यांच्या निधनामुळे भारताच्या अणू कार्यक्रमाला मोठा धक्का बसला. 

२०११ : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा स्मृतीदिन
भीमसेन जोशी हे लोकप्रिय ंिहदुस्तानी शास्त्रीय गायक होते. ’सवाई गंधर्व’ म्हणून ख्यातनाम असलेले रामभाऊ कुंदगोळकर यांच्या मार्गदर्शनात भीमसेन जोशी यांनी  हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. भीमसेन जोशींना हिंदुस्थानी शास्त्रीय गायन पद्धतीचे ख्याल गायक म्हणत असले तरी त्यांनी १९४०  च्या दशकात लखनौमध्ये एक वर्ष राहून तेथील ख्यातनाम गायकांकडून ठुमरी शिकून घेतली होती. ते ठुमरीही अतिशय छान गात. भीमसेन जोशींनी संतवाणी या नावाने मराठी अभंगगायनाचे अÞक्षरश: हजारो कार्यक्रम केले. त्यांनी आपले गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ सुरू केलेला सवाई गंधर्व संगीत महोत्सव हा भारतातील एक मोठा संगीतोत्सव समजला जातो. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात पंडित भीमसेन जोशी यांच्या नावाने अध्यासन स्थापण्यात आले आहे. भीमसेन जोशी यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराआधी पद्मश्री, पद्मभूषण या नागरी पुरस्कारांनीही गौरवण्यात आले होते. त्याशिवाय १९७६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला.