१४६ खासदारांचे निलंबन मागे

yongistan
By - YNG ONLINE
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
३१ जानेवारी २०२४ पासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्यानंतर लगचेच दुस-या दिवशी १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम बजेट मांडणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अंतरिम बजेट असणार आहे. दरम्यान, संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवरून २०२३ च्या हिवाळी अधिवेशनात गोंधळ घालणा-या विरोधी पक्षांच्या निलंबित १४६ खासदारांचे निलंबन रद्द करण्यात आले. त्यामुळे मोदी सरकारच्या यंदाच्या अखेरच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाग घेता येणार आहे. 

मागील हिवाळी अधिवेशनात विक्रमी संख्येने १४६ खासदार निलंबित झाले होते. त्यापैकी मागील अधिवेशनाच्या काळापुरते निलंबित झालेल्या खासदारांना उद्यापासून अधिवेशनात सहभागी होता येणार आहे. उर्वरित लोकसभेच्या ३ आणि राज्यसभेच्या ११ खासदारांना विशेषाधिकार समितीने दोषी ठरवले होते. परंतु उपराष्ट्रपतींनी आपले अधिकार वापरून त्यांचे निलंबन रद्द केले. त्यामुळे सर्व खासदार अधिवेशनात सहभागी होऊ शकणार आहेत. हिवाळी अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेच्या १४६ खासदारांना निलंबित करण्यात आले होते.