२० जानेवारी : अप्सरा पहिल्या अणुभट्टीचे लोकार्पण

yongistan
By - YNG ONLINE
२० जानेवारी रोजी आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करण्यात आली. सरहद गांधी आणि बादशाह खान या नावाने प्रसिद्ध खान अब्दुल गफार खान यांचे आजच्या दिवशी १९८८ साली निधन झाले. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी आजच्याच दिवशी झाला. 

१८७१ : सर रतनजी जमशेदजी टाटा यांचा जन्म
सर रतनजी टाटा यांचा जन्म आजच्या दिवशी झाला होता. ते भारतातील प्रसिद्ध पारशी उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते जमशेदजी नसरवानजी टाटा यांचे पुत्र होते. भारतातील टाटा समूहाच्या वाढीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. २० जानेवारी १८७१ रोजी मुंबईत जन्म झाला. टाटा अँड कंपनीसह इंडियन हॉस्टेल्स कंपनी लिमिटेड, टाटा लिमिटेड, लंडन टाटा आयर्न अँड स्टील वर्क्स सकची, द टाटा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी लिमिटेड इंडियाचे ते संचालक होते.

१८९८ :  मास्टर कृष्णराव यांचा जन्म 
कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा मास्टर कृष्णराव यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला.  प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार अशी त्यांची ओळख. त्यांच्या गायनात ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर घराण्यांचा संगम दिसून यायचा. वंदे मातरम या गीताला त्यांनी दिलेली चाल लोकप्रिय ठरली. 

१९५७ : आशियातील पहिली अणुभट्टी देशाला अर्पण 
आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण केली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भाभा अणुसंशोधन केंद्र, ट्रॉम्बे (बॉम्बे) येथे उभारलेल्या अप्सरा या देशातील पहिल्या अणुभट्टीचे उद्घाटन केले. अ‍ॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ज्या संस्थेचे सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र असे आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती. या विचारातून त्यांनी अणुउर्जा आयोगाची स्थापना केली. आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ. होमी भाभा यांची नेमणूक केली.  

१९८८ : खान अब्दुल गफार खान यांचे निधन
सरहद्द गांधी आणि बादशाह खान या नावाने प्रसिद्ध खान अब्दुल गफार खान यांचे आजच्या दिवशी १९८८ साली निधन झाले. ते वायव्य सरहद्द प्रांतातील स्वातंत्र्यसेनानी होते. ज्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतला होता. भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते. त्यांना महात्मा गांधीसारखे अहिंसा आंदोलनासाठी ओळखले जात होते. ब्रिटिश इंडिया मध्ये त्यांना ‘फ्रंटियर गांधी’ या नावाने संबोधले जायचे.  

१९९९ : गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर 
प्रसिद्ध नाटककार आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांवा १९९९ साली साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तुघलक, नागमंडल, हयवदय या नाट्यकृतींचें दिग्दर्शन गिरीश कर्नाड यांनी केले होते. गिरीश कर्नाड यांचा पद्म आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मान झाला आहे. ययाती हे गिरीश कर्नाड यांचे पहिले नाटक.   निशांत, मंथन, इक्बाल, डोर, एक था टायगर, टायगर ंिजदा है या चित्रपटांमधूनही कर्नाड यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. जब्बार पटेल दिग्दर्शित उंबरठा या मराठी चित्रपटात गिरीश कर्नाड यांनी भूमिका साकारली होती.  
२००५ : परवीन बाबी यांचं निधन
परवीन बाबी यांचे आजच्या दिवशी निधन झाले. आपल्या ग्लॅमरस शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या परवीन बाबी यांनी अमर अकबर अ‍ॅन्थनी, दीवार, नमक हलाल, शान यासह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये नायिकेची भूमिका निभावली होती.  
२००८ : पहिल्यांदाच सिनेमॅटोग्राफरला 
         दादासाहेब फाळके पुरस्कार 
पहिल्यांदाच एखाद्या सिनेमॅटोग्राफरला दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.  १९६९  साली दादासाहेब फाळके पुरस्काराची स्थापना करण्यात आली.  चित्रपट जगतातील महान सिनेमॅटोग्राफर व्ही के मूर्ती यांना २००८ सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. एखाद्या सिनेमॅटोग्राफरला चित्रपट जगतातील हा सर्वोच्च सन्मान देण्याची ही पहिलीच वेळ होती. 

२००९ : अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी
अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी आजच्या दिवशी झाला होता. अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून बराक ओबामा यांनी पदभार स्वीकारला.