राज्यात ९ कोटी १२ लाखांवर मतदार

yongistan
By - YNG ONLINE
-मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक पारदर्शी आणि निर्भयी वातावरणात पार पाडण्यासाठी राज्याची निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी येथे दिली. संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ९ कोटींपेक्षा जास्त मतदार आपला हक्क बजावणार आहेत. ही संख्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २७ लाखांनी जास्त असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली. यासंबंधीची अंतिम यादी २३ जानेवारी २०२४ रोजी जारी करण्यात आली. 
राज्यात मुख्य निवडणूक अधिका-यांंच्या कार्यालयाकडून २७ ऑक्टोबर २०२३ ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत हे काम सुरू होते. त्यानंतर या कार्यालयाकडे आलेल्या माहितीनुसार २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९ कोटी १२ लाख ४४ हजार ६७९ इतके नागरिक मतदानासाठी पात्र ठरले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हा आकडा ८ कोटी ८५ लाख ६४ हजार ५३५ इतका होता, असे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यात  २६ लाख ८० हजार १४४ मतदारांची भर पडली आहे. यामध्ये पुरूष, महिला आणि तृतीयपंथी मतदारांचा  समावेश आहे. यंदा पुरूष मतदार  ४ कोटी ७४ लाख  ७२ हजार ३७९ असून गेल्यावेळीपेक्षा ११ लाख ५७ हजार १२८ ने पुरुष मतदारांची संख्या वाढली आहे.  तर महिला मतदारांची संख्या  ४ कोटी ३७ लाख ६६ हजार ८०८  इतकी असून  २०१९ च्या तुलनेत महिला मतदारांची संख्या  १५ लाख १९ हजार ९३० ने वाढली  आहे. यंदा एकूण  ५ हजार ४९२ तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे.
यंदा २४ लाख  ३३ हजार ७६६  नव्या मतदारांची नोंदणी झाली असून  दुबार नोंदणी अन्य कारणांमुळे २० लाख २१ हजार ३५० मतदारांची नवे  वगळण्यात आली आहेत. त्यामुळे अंतिम यादीमध्ये ४ लाख १२ हजार ४१६ मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे. 

२३ जानेवारी २०२४ पर्यंतची मतदारांची स्थिती

पुरुष मतदार........ ४ कोटी ७४ लाख ७२ हजार ३७९
स्त्री मतदार........ ४ कोटी ३७ लाख ६६ हजार ८०८
तृतीयपंथी ... ५ हजार ४९२
मतदान केंद्रांची संख्या.... ९७ हजार ३२५