अंडर १९ वर्ल्डकपमध्येही ऑस्ट्रेलियाच विजेता

yongistan
By - YNG ONLINE
भारताचा पराभव, भारतीय युवा फलंदाजांनीही खाल्ली कच
बेनोनी : वृत्तसंस्था
१९ वर्षांखालील वर्ल्डकप २०२४ ची अंतिम लढत रविवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी बेनानी येथे पार पडली. या लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ७९ धावांनी पराभव केला. १९ वर्षांखालील टीम इंडिया या वर्ल्डकपमध्ये शानदार कामगिरी करीत आली. परंतु अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे गुडघे टेकले. 

ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी फायनल वनडे वर्ल्डकपची फायनल आणि आता १९ वर्षाखालील वर्ल्डकपच्या फायनलमध्येही भारताला पराभूत केले. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच १९ वर्षाखालील वर्ल्डकप फायलनमध्ये भारताचा पराभव केला. याचबरोबर त्यांनी चौथ्यांदा १९ वर्षाखालील वर्ल्डकप जिंकला. भारताने २०१२ आणि २०१८ च्या १९ वर्षाखालील वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला मात दिली होती.

आज ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या २५४ धावांचे आव्हान पार करताना भारताचा संपूर्ण संघ १७४ धावात गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून बिअर्डमन आणि मॅकमिलनने भेदक मारा केला. या दोघांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. भारताकडून सलामीवीर आदर्श सिंगने सर्वाधिक ४७ धावा केल्या. मात्र, या धावा करण्यासाठी त्याने ७७ चेंडू घेतले.

या व्यतिरिक्त फक्त तीन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. मुशीर खानने २२ तर मुर्गन अश्विनने ४२ धावा केल्या. नमन तिवारीने १३ धावांची खेळी करत मुर्गनला साथ देण्याचा प्रयत्न केला. बेअर्डमन आणि मॅकमिलन यांनी प्रत्येकी ३ तर वाईल्डरने २ विकेट्स घेतल्या. भारताकडून राज लिंबानीने सर्वाधिक ३ तर नयन तिवारीने २ विकेट्स घेतल्या. आतापर्यंत १९ वर्षाखालील वर्ल्डकप फायनलमध्ये २५३ धावांचे आव्हान कोणी पार केलेले नाही. 
...................................................
विजयश्री खेचून आणणारे ५ कर्णधार
मोहम्मद कैफ (२०००)
भारताने सर्वात पहिल्यांदा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २००० साली जिंकला. त्यावेळी भारताचा कर्णधार होता मैहम्मद कैफ. या वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत भारताने श्रीलंकेवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला. त्यानंतर मोहम्मद कैफला भारतीय संघात स्थान मिळाले. कैफ हा भारताकडून २०००-२००६ या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला. सध्या तो समालोचन करत आहे.

विराट कोहली (२००८)
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने २००८ साली १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला होता. या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला आणि विश्वचषकाला गवसणी घातली. त्यानंतर विराट कोहली हा भारतीय संघात आला. २०११ च्या वर्ल्ड कप विजयी संघात कोहली होता. कोहली अजूनही भारतीय संघात आहे आणि वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विश्वविक्रम त्याच्या नावावर आहे. 

उन्मुक्त चंद (२०१२)
उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०१२ साली वर्ल्ड कप जिंकला. या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ६ विकेट्स राखून पराभूत केले. या सामन्यात चंदने १११ धावांची दमदार खेळी साकारली होती. त्यानंतर चंद भारतीय संघात येईल, असे वाटत होते. पण तो भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला. त्याने देश सोडण्याचा निर्णय घेतला. आता तो अमेरिकेकडून क्रिकेट खेळत आहे.

पृथ्वी शॉ (२०१८)
पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८ साली झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट्स राखून पराभव केला. या संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये पृथ्वीने २६१ धावा केल्या होत्या. त्यानंतर पृथ्वीने भारताच्या कसोटी संघात एंट्री केली. पदार्पणाच्या सामन्यात पृथ्वीने वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावले. दरम्यान, पृथ्वीच्या धावांचा आलेख घसरला आणि त्याला भारतीय संघातून काढण्यात आले. 

यश धुल (२०२२)
भारताने २०२२ साली इंग्लंडला पराभूत करत १९ वर्षांखालील वर्ल्ड कपला गवसणी घातली. त्यावेळी यश धुल हा कर्णधार होता. त्याने संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये २२९ धावा केल्या होत्या. त्यानंतर यशला आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाने संधी दिली होती. दिल्लीच्या रणजी संघाकडूनही तो खेळत आहे. रणजीत त्याला कर्णधार म्हणून छाप सोडता आली नाही.