तिन्ही मान्यवरांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर, मोदींची घोषणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत सरकारने दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी एकाच वेळी ३ दिग्गजांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. यामध्ये माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, नरसिंह राव आणि एमएस स्वामीनाथन (मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार) यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकापाठोपाठ एक तीन ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. गेल्या आठवड्यात भारत सरकारने माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. एकाच आठवड्यात चार दिग्गजांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. एखाद्या क्षेत्रात असाधारण आणि सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल केंद्र सरकारकडून भारतरत्न पुरस्कार दिला जातो. राजकारण, कला, साहित्य, क्रीडा, विज्ञान क्षेत्रातील विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवक यांना या पुरस्काराने गौरवण्यात येते. कृषी क्षेत्रात भरीव योगदानामुळे एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न (मरणोत्तर) पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतक-यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. शेतकरी बंधू-भगिनींप्रती असलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यासोबतच भारतीय कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणा-या एम. एस. स्वामीनाथन, देशाच्या आर्थिक विकासाचे द्वार उघडणारे माजी पंतप्रधान दिवंगत पी. व्ही. नरसिंहराव यांना देशातील सर्वोच्च मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला.
चौधरी चरण सिंह
माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाला हा पुरस्कार समर्पित करत आहोत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असो किंवा देशाचे गृहमंत्री किंवा साधे आमदार असतानाही त्यांनी केवळ राष्ट्र निर्माणाला महत्त्व दिले. आणीबाणीच्या विरोधातही त्यांनी ठाम भूमिका घेतली
चौधरी चरण सिंह यांचा जन्म १९०२ मध्ये उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील नूरपूर येथे एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. ते सर्वप्रथम १९३७ मध्ये छपरोली येथून उत्तर प्रदेश विधानसभेसाठी निवडले गेले. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी काम केले. त्यावेळी त्यांनी शेतक-यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
१९७९ मध्ये नाबार्डची स्थापना
१९७९ साली ते देशाचे अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान बनले. त्याच वर्षी त्यांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्डची स्थापना केली. २८ जुलै १९७९ रोजी चौधरी चरण सिंह समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने देशाचे पंतप्रधान बनले. चौधरी चरण सिंह यांना वाचनाची आणि लिखाणाची आवड होती. त्यांनी जमीनदारी निर्मूलन, भारतातील गरिबी व त्यावरील उपाय, शेतक-यांची मालकी की शेतक-यांसाठी जमीन, प्रिवेन्शन ऑफ डिविजन ऑफ होल्डिंग्स बिलो ए सर्टन मिनिमम, को-ऑपरेटीव फार्मिंग एक्स-रेड या पुस्तकांचे लिखाण केले.
पी व्ही नरसिंह राव
एक प्रतिष्ठित विद्वान राजकारणी पी. व्ही. नरसिंह राव यांनी भारताच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांनी आंध्र प्रदेशचे (एकत्रित) मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्ष संसद आणि विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारत आर्थिक आघाडीवर पुढे आला. देशाला समृद्धी आणि विकासाच्या मार्गावर नेण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली
राजीव गांधी यांच्या निधनानंतर देशात पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आली आणि पी व्ही नरसिंह राव पंतप्रधान झाले. १९९१ ते १९९६ या दरम्यान ते देशाचे नववे पंतप्रधान होते. १९९१ साली भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना देशावर आर्थिक संकट आले. त्यावेळी त्यांनी नव्या आर्थिक सुधारणा हाती घेतल्या. त्यावेळचे अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांच्या साथीने त्यांनी १९९१ साली भारतीय अर्थव्यवस्था खुली केली आणि जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरणाचे धोरण राबवले. आज जो काही भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दिसत आहे, त्यामध्ये पी व्ही नरसिंह राव यांचे महत्त्वाचे योगदान होते. देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे २३ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले.
एमएस स्वामीनाथन
हरित क्रांतीचे जनक आणि ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनाही भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. कृषी आणि शेतक-यांच्या कल्याणासाठी झटणा-या डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करताना मनस्वी आनंद वाटत आहे. अतिशय आव्हानात्मक काळात स्वामीनाथन यांनी भारतीय कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्यात मोलाची भूमिका वठवली.
स्वामिनाथन यांना १९८७ मध्ये प्रथम जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी चेन्नई येथे एमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली. अनेक पुरस्कारांव्यतिरिक्त, स्वामिनाथन हे रॅमन मॅगसेसे पुरस्कार (१९७१) आणि अल्बर्ट आइनस्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार (१९८६) प्राप्तकर्ते आहेत. तामिळनाडूमधील तंजावर जिल्ह्यात स्वामीनाथन यांचा जन्म झाला. १९६० च्या दशकात जेव्हा नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतात मोठ्या प्रमाणात दुष्काळाची शक्यता होती, तेव्हा उच्च उत्पादन देणा-या गहू आणि तांदळाच्या जाती भारतात आणल्याबद्दल आणि विकसित करण्यासाठी त्यांना प्रथम जागतिक अन्न पुरस्कार देण्यात आला होता. त्यांची मुलगी डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी २०१९-२०२२ पर्यंत जागतिक आरोग्य संघटनेत मुख्य शास्त्रज्ञ म्हणून काम केले. त्यांनी जानेवारीच्या सुरुवातीला एमएसएसआरएफचे अध्यक्षपद स्वीकारले आहे.