पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका होऊन १५ दिवस उलटले तरी तिथे अद्याप सरकार स्थापन होऊ शकले नाही. सरकार स्थापन करण्यासाठी नवाज शरीफ यांच्या मुस्लिम लीग आणि बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीमध्ये बैठकीच्या पाच फेऱ्या होऊनही समाधानकारक तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे पाकिस्तानात कमालीची अस्थिरता पसरली आहे.
पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ हा पक्ष सत्तेवर होता आणि इम्रान खान त्या सरकारचे प्रमुख म्हणजेच देशाचे पंत्रधानपद होते. मात्र पंतप्रधान असताना इम्रान खान यांनी पाकिस्तानी लष्कराच्या मर्जीवर सरकार चालविण्यास नकार दिल्याने लष्कराने कट कारस्थान करून त्यांचे सरकार पाडले आणि आपल्या मर्जीतील शहाबाज शरीफ यांना पंतप्रधान केले. मात्र शहाबाज शरीफ यांची कारकीर्द निराशाजनक राहिली. त्यांच्या कारकिर्दीत पाकिस्तानात महागाईने कळस गाठला. जनता रस्त्यावर उतरली. कर्जाचा डोंगर वाढत गेला. पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला गेली. या दरम्यान शहाबाज शरीफ यांनी इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात डांबले. निवडणूक आयोगाने इम्रान खान यांच्या पक्षाची मान्यता रद्द केली. त्यांना दिलेले बॅट हे चिन्ह काढून घेतले. त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घातली. त्यामुळे पाकिस्तानी जनतेत शहाबाज शरीफ यांच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला. हा रोष आपल्याला परवडणार नाही, हे हेरून पाकिस्तानी लष्कराने शहाबाज शरीफ यांचे मोठे बंधू नवाज शरीफ यांना लंडनवरून पाचारण केले आणि त्यांना पंतप्रधान करण्याचा चंग बांधला. निवडणुका घोषित झाल्या. निवडणुका झाल्यावर नवाज शरीफ यांना पंतप्रधान करून आपल्या हातचे बाहुले बनवायचे आणि त्यांच्या मार्फत आपल्याला हवा तसा कारभार करायचा असा पाकिस्तानी लष्कराचा डाव होता. मात्र इम्रान खान यांना ज्याप्रकारे तुरुंगात डांबण्यात आले, त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करण्यात आली, त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली हा सर्व प्रकार पाकिस्तानी जनतेला रुचला नाही. पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती निर्माण झाली. हीच सहानुभूती हेरून इम्रान खान यांनी आपल्या समर्थकांना अपक्ष म्हणून निवडणुकीत उभे केले. पक्षाची मान्यता काढून घेण्यात आली. पक्ष चिन्ह गोठवण्यात आले, पक्ष प्रमुखास निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली, त्याला तुरुंगात डांबण्यात आले तरीही इम्रान खान यांच्या समर्थकांनी निवडणुकीत घवघवीत यश मिळवले. अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या इम्रान खान यांच्या समर्थकांनी निवडणुकीत सर्वाधिक जागा पटकवल्या.
इम्रान खान यांच्या समर्थकांनी २६५ पैकी १०० वर जागा पटकवल्या तर नवाज शरीफ यांच्या मुस्लिम लीगला ७५, बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला ५४ जागा मिळाल्या. मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट या पक्षाला १७ जागा मिळाल्या. कोणालाच बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्या तरी दोन पक्षांची आघाडी होणे आवश्यक होते.
इम्रान खान यांच्या समर्थकांनी आपण कोणासही पाठिंबा देणार नाही, असे जाहीर केल्याने नवाज शरीफ आणि बिलावल भुट्टो यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिला नाही. सरकार स्थापन करण्यासाठी दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यात सरकार स्थापनेसाठी पाच बैठका झाल्या. नवाज शरीफ यांच्या पक्षाला अधिक जागा असल्याने पहिले तीन वर्ष नवाज शरीफ पंतप्रधान राहतील व उरलेले दोन वर्ष बिलावल भुट्टो पंतप्रधान होतील, असे ठरले. मात्र ऐनवेळी बिलावल भुट्टो यांनी माघार घेतली. जनतेच्या मनात असेल तेंव्हाच आपण पंतप्रधान होऊ असे त्याहून जाहीर केले. एका अर्थी त्यांनी नवाज शरीफ यांच्याशी आघाडी करण्यास नकार दिला. त्यामुळे पाकिस्तानातील पेच आणखी वाढला.
आता सत्ता स्थापन करण्यासाठी नवाज शरीफ यांना इम्रान खान यांच्या समर्थकांना फोडावे लागेल. अर्थात ही गोष्ट वाटती तितकी सोपी नाही. त्यामुळे आगामी काही काळ पाकिस्तानात अस्थिरताच राहील आणि दररोज नवे राजकीय नाट्य पाहायला मिळेल. या राजकीय पेचात खरी गोची झाली ती पाकिस्तानच्या लष्कराची. जनतेने कोणालाही बहुमत न दिल्याने नवाज शरीफ यांना पंतप्रधान बनवून त्यांच्या आडून पाकिस्तानचे सूत्रे स्वतःच्या हाती ठेवायचे हे लष्कराचे मनसुबे धुळीस मिळाले. या परिस्थितीत पाकिस्तानचे लष्करप्रमुखच परवेज मुशर्रफांप्रमाने स्वतः च पाकिस्तानचे प्रमुख होतील, असा कयास काही जाणकार लावत आहे. मात्र ती शक्यता धूसर आहे. कारण सध्या पाकिस्तानची अवस्था अतिशय दयनीय आहे. देशात प्रचंड बेरोजगारी आहे. महागाईने कळस गाठला आहे. कर्जाचा डोंगर वाढला आहे. अर्थव्यवस्था रसातळाला पोहचली आहे. दहशतवादाचा भस्मासुर आता त्यांच्यावरच उलटत आहे. एकेकाळचा मित्र असलेला इराण आता शत्रू बनून पाकिस्तानवर सर्जीकल स्ट्राईक करत आहे. तालिबानचे सैनिक पाकिस्तानात घुसखोरी करून सीमेवरील गावे बळकावू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची पत कमी झाली आहे, अशा अवस्थेत लष्कर स्वतः सत्ता स्थापन करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच लष्कराला कोणी तरी बळीचा बकरा हवा आहे. हा बळीचा बकरा नवाज शरीफ बनतो की बिलावल भुट्टो बनतो, हे येणारा काळच सांगेल. मात्र तोवर पाकिस्तानात अशीच राजकीय अस्थिरता कायम राहील. हे नक्की.
- श्याम ठाणेदार, दौंड