भारताच्या स्वतंत्र संग्रामात अनेक ज्ञात/अज्ञात क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली व आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केले. यामध्ये प्रामुख्याने क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचे नाव मोठ्या अभिमानाने आजही घेतले जाते. अल्पवयात देशासाठी लढा उभारणारे महान क्रांतिकारक म्हणून चंद्रशेखर आझाद यांची ख्याती आहे. २७ फेब्रुवारी रोजी त्यांची पुण्यतिथी आहे.
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै १९०६ रोजी मध्य प्रदेशातील झाबुआ (अलिराजपूर) जिल्ह्यातील भावरा या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा या गावात झाले. परंतु आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत शिकत असतानासुद्धा त्यांच्यात क्रांतीची ज्वाला धकधकत होती. चंद्रशेखर आझाद यांचे बालपण भिल्ल जमातीच्या वस्तीत गेले. त्यामुळे ते धनुष्यबाण उत्तम रीतीने चालवत म्हणजेच त्यांच्यात बालपणापासून लढवय्या व क्रांतिकारक वृत्ती होती.
१३ एप्रिल १९१९ रोजी झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांड घटनेचा चंद्रशेखर आझाद यांच्या मनावर चांगलाच परिणाम झाला. त्यानंतर चंद्रशेखर आझाद १९२० मध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील असहकार चळवळीचा एक भाग बनले आणि वयाच्या १५ व्या वर्षी त्यांना अटकही झाली. अशा परिस्थितीत ब्रिटन न्यायालयाने या छोट्याशा मुलाला १२ फटक्यांची अमानुष शिक्षा दिली. चंद्रशेखर आझाद यांचे मूळ नाव चंद्रशेखर सीताराम तिवारी होते. परंतु बालवयातील अमानुष शिक्षा पाहता ब्रिटिश न्यायालयात नाव नोंदविताना आपले आडनाव आझाद असल्याचे नोंदविले. तेव्हापासून संपूर्ण हिंदुस्थानात चंद्रशेखर आझाद नावाने ओळखले जाऊ लागले.
आझाद यांचा क्रांतीकारी हेतू पाहता १९२२ साली महात्मा गांधींनी आझाद यांना असहकार चळवळीतून काढून टाकले. त्याचे आझाद यांना खुप वाईट वाटले.अशा परिस्थितीत त्यांनी गुलामगिरीत असलेल्या भारताला स्वातंत्र्य करण्याची शपथ घेतली. पुढे त्यांची भेट हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे संस्थापक राम प्रसाद बिस्मिल यांच्याशी झाली व क्रांतीची ज्योत आणखी प्रज्वलित झाली. क्रांतीची ज्वाला संपूर्ण भारतात पसरविण्याच्या दृष्टीने मातृभूमीच्या रक्षणार्थ अनेकांना आंदोलनात सहभागी होण्यास प्रेरित केले.
इंग्रजांना आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याच्या हेतूने व क्रांतिकारकांची भीती इंग्रजांमध्ये निर्माण व्हावी या उद्देशाने आझाद यांनी आपल्या बळावर काकोरी ट्रेन लुटली आणि व्हाइसरॉयच्या ट्रेनला उडविण्याचादेखील प्रयत्न केला.इंग्रजांच्या असेम्ब्लीत बॉम्ब फोडण्याच्या घटनेत चंद्रशेखर आझाद यांनी भगतसिंग यांना पुरेपूर मदत केली.चंद्रशेखर आझाद हे भगतसिंग यांचे मुख्य सल्लागार होते. भगतसिंग यांना अटक झाल्यानंतर त्यांना सोडविण्यासाठीदेखील आझाद यांनी भरपूर प्रयत्न केले.अशा परिस्थितीत इंग्रजांना नेहमी प्रमाणे चकमा देतच होते.
दि. २७ फेब्रुवारी १९३१ रोजी अलाहाबाद मधील अल्फ्रेड पार्क येथे राजगुरू हे जेलमध्ये असताना त्यांच्या आईला आर्थिक मदत व्हावी, यासाठी ते एका क्रांतिकारक सहका-याला भेटण्यासाठी गेले असता एका अज्ञात खब-याने इंग्रजांना चंद्रशेखर आझाद असल्याची वार्ता दिली आणि मोठा घात झाला. इंग्रजांना वार्ता मिळताच मैदानाला वेढा घातला. अशा परिस्थितीत चंद्रशेखर आझाद व इंग्रज सैन्य यांच्यात गोळीबार झाला. अशावेळी आझाद यांनी तीन इंग्रजांना धाराशाही केले. आपल्या जवळच्या गोळ््या संपत आहे हे त्यांच्या लक्षात आले. अशा परिस्थितीत त्यांना इंग्रजांच्या हातून मरणे पसंत नव्हते. शेवटच्या गोळीने स्वत:ला मारून घेतले आणि क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद देशांच्या स्वतंत्र लढ्यासाठी शहीद झाले. भारत स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी कशाचीही पर्वा न करता आपल्या प्राणांची आहुती दिली अशांमध्ये आघाडीवर घेतले जाणारे नाव म्हणजे क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद. क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना कोटी-कोटी प्रणाम.जय हिंद.
रमेश कृष्णराव लांजेवार, नागपूर