मुंबई : जवळपास ३८ वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पंजाची साथ सोडली. १२ फेब्रुवारी रोजी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर लगेचच १३ फेब्रुवारीच्या दुपारी भाजप प्रदेशाध्यक्ष भाजप चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला. त्यामुळे कॉंग्रेसला मोठा धक्का बसला.
दुसरीकडे काँग्रेस प्रभारी रमेश चैन्नीथला यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेत्यांची १३ फेब्रुवारी रोजी बैठक झाली. याशिवाय चैन्नीथला यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ शरद पवारांनाही जाऊन भेटले. पण या सगळ््यात चव्हाणांचा भाजप प्रवेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना महागात पडू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि के. सी. वेणूगोपाल यांनी थेट थोरातांना फोन करुन पक्षाचे डॅमेज कंट्रोल रोखण्याचे आणि संघटनेच्या पुनर्बांधणीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांना राज्यसभा निवडणुका आणि सध्याची पक्षसंघटना बांधण्याची जबाबदारी मिळणार असल्याचेही कळते.