आवाजाचा जादुगर अमिन सयानी यांचे निधन

yongistan
By - YNG ONLINE


 1950 ते 2000 च्या दशकात रेडिओवर बहनों और भाईयों... म्हणत आपल्या शब्दांनी श्रोत्यांवर गुंफण घालणारे प्रसिद्ध रेडिओ निवेदक अमीन सयनी यांचे झालेले दुःखद निधन ( 20 फेबु.2024) त्यांच्या असंख्य चाहते आणि रेडिओ प्रेमी रसिकांना चुटपुट लावणारे ठरले आहे.  त्यांचा बीनाका गीतमाला कार्यक्रम ऐकण्यासाठी श्रोते हातातील कामे बाजूने ठेवून रेडिओला चिटकून बसलेले दिसायचे. त्यातून सुंदर असा द्वैत आणि अद्वैत याचा सुंदर मिलाप घडल्याशिवाय राहत नसायचा.  त्यांच्या जाण्याने रेडिओच्या सुवर्णयूगाचा एक साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेल्याचे दुःख श्रोत्यांना होते आहे. 
                 जेष्ठ निवेदक अमीन सयानी यांचा जन्म मुंबईत  1932 साली झाला. जनतेचे रेडिओ हे ज्ञान आणि मनोरंजनाचे साधन होते.  
1951 ते 2000 पर्यतचा काळ त्यांच्या खुमासदार निवेदनाने भारावून टाकणारा राहिला. त्यांचे 'अगले पायदान पर..' हे असे भुरळ घालणारे शब्द आजही श्रोत्यांच्या मनावर गारुड घालून आहेत. 
त्याकाळी 1950- 60 च्या दशकात अमीन सयानी या धुंदफुंद  शब्दाच्या व्यक्तिमत्वाने त्यांचे लोकप्रियतेचे गमक एका मुलाखतीत सांगितले होते ते म्हणाले... 'माझा कार्यक्रम ऐकताना प्रत्यक्ष श्रोत्याला  मी जणू त्यांच्याशीच बोलतो  आहे  असे वाटावे  ही माझी कल्पना होती व तसेच झालेही असे ते म्हणाले.  अस्खलित हिंदी भाषेत निवेदन करण्याचे एक वेगळेच रसायन अमीन यांनी मिळवले होते.  हिंदी गाण्याचे विविध किस्से ऐकवत 'बिनाका गीतमाला' कार्यक्रम त्यांनी लोकप्रिय केला. त्या कार्यक्रमाची मोहोर आजही त्या काळाच्या रसिक श्रोत्यांवर उमटलेली  दिसून येते.     
                 उत्तम निवेदन, निवेदनातील चढउतार, निवेदनातील माधुर्यता आणि निवेदनातील गुपित  त्यांनी शेवटपर्यंत जपले.  रेडिओवर  पहिलाच निवेदनाचा कार्यक्रम यशस्वी करून दाखविल्यावर देशभरातून सुमारे नऊ हजार श्रोत्यांनी त्यांना पत्रे लिहून त्यांच्या निवेदनाचे  आणि आवाजाचे केलेले कौतुक  ही त्यांना मिळालेली रसिक-श्रोत्यांची पावती होती. रेडिओ म्हणजे अमीन सयानी हे नाते जुळलेले होते.  बहनों और भाईओं.... म्हटलं की रसिक श्रोत्यांच्या भुवया आपोआप उंचावल्या जायच्या.  त्यांनी गाणकोकिळा लता मंगेशकर, राज कपूर या दिग्गज कलावंतांच्या घेतलेल्या मुलाखती खूप गाजल्या.  कदाचित रेडिओ या माध्यमाला लोकप्रिय करण्यात अमीन यांचा महत्त्वाचा वाटा होता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.  त्यांच्यावर कौटुंबिकच साध्या, सोप्या भाषेचे संस्कार झाले होते.  म्हणूनच तब्बल 42 वर्षे 'बिनाका का गीतमाला'  कार्यक्रमाचे निमित्ताने हा निवेदक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेला. भारदस्त  आवाज, हिंदी- इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आणि चित्रपट संगीत क्षेत्राचे सखोल ज्ञान मिळवून निवेदनाच्या क्षेत्रात आपली उंची गाठणारे ते चतुर्थस्थ निवेदक म्हणून ख्यातकीर्त राहिले. त्यांचे निवेदन जेथे जेथे लाभले ती बहुतेक गाणी प्रचंड गाजली. 
               स्वातंत्र्यपूर्वकाळात अमीन सयानी  यांच्या आई सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या कार्याचे महात्मा गांधीना  प्रचंड कौतुक होते.  म्हणूनच अमीन सयानीवर घरातूनच  महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव पडला.  म्हणूनच वैचारिक अधिष्ठान लाभलेल्या सयानी यांना जवळपास 19 हजार जिंगलसना आपला मधुर आवाज देण्याचे भाग्य लाभले.  त्यांच्या या विक्रमाची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड 'मध्ये झाली.  त्या काळाचा भूत बंगला, तीन देविया,  कत्तल यांसारखा चित्रपटांमध्ये अनाऊंसर म्हणून त्यांनी उत्तम काम केले.  म्हणून रेडिओ जगतातील त्यांना मोठे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले ज्यात लिव्हिंग लिजेंड अवॉर्ड 2006, गोल्ड मेडल 1991, पर्सन ऑफ द इयर 1992 , रेडिओ मिर्ची कडून कान हॉल ऑफ द फेम पुरस्कार 2003 इत्यादी पुरस्कार त्यांनी त्यांच्या स्वकर्तृत्वाने  मिळवली.  असा आवाज श्रोत्यांच्या मनात आजही घर करुन आहे. म्हणूनच असा निवेदक आणि तो मखमली शब्द स्वर  पुन्हा होणे नाही.  त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली..!

...........................

- बाळासाहेब जोगदंड
 छ.संभाजीनगर