चैत्राम पवार यांना पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार

yongistan
By - YNG ONLINE

मुंबई : प्रतिनिधी 
राज्य शासनाचा महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार धुळ््यातील बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना मंगळवार, दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी पुरस्कार जाहीर झाला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. २० लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. ओसाड पाड्याचे नंदनवन करणा-या चैत्राम पवार यांच्या कामाचा वन विभागाकडून गौरव करण्यात आला. चंद्रपूर येथे आयोजित ताडोबा महोत्सवात ३ मार्च रोजी पवार यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दुर्गम असा बारीपाडा हा वनवासीपाडा आहे. या पाड्याची सन १९९२ पूर्वीची परिस्थिती म्हणजे उजाड, ओसाड माळरान. पिण्यासाठी घोटभर पाणी नाही, अशी होती. पण १९९२ नंतर हे चित्र पार बदलले. गावात मोठ्या उमेदीने आणि दुर्दम्य आशावादाने चैत्राम पवार उभे राहिले व त्यांना गावातल्या आदिवासी मावळयांनी साथ दिली. या लोकचळवळीची दखल जगाने घेतली. जगातील ७८ देशांमध्ये चांगले गाव कसे असावे, याविषयी झालेल्या तज्ज्ञांच्या सर्व्हेमध्ये बारीपाडाने द्वितीय क्रमांक पटकावला. त्याचबरोबर बारीपाडा प्रकल्पास अत्यंत मानाचा समजला जाणारा आयएफएडी या आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार मिळाला. 
वनवासी कल्याण आश्रमाच्या मदतीने चैत्राम पवार यांनी महाराष्ट्र आणि गुजरातमधील जवळपास १०० गावांमध्ये त्यांच्या कामाचा विस्तार केला. सध्या पवार हे मराठवाडा आणि खान्देश भागासाठी या वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. चैत्राम पवार व गावक-यांच्या श्रमदानातून व दैदिप्यमान शक्तीमधून उभे राहिलेल्या बारीपाडा या आदिवासी पाडयाची यशोगाथा आहे. म्हणून चैत्राम पवार यांना महाराष्ट्राचा पहिल्या वनभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
वनसंवर्धन, पर्यावरणात मोठे काम 
राज्य शासनाच्या वन विभागाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन स्थानिक नागरिकांना त्यासाठी प्रोत्साहित करणे, राखीव वनक्षेत्र आणि आजूबाजूच्या परिसरातील गावात वृक्ष लागवड आणि वनसंवर्धन आणि पर्यावरणासाठी त्यांचे काम उल्लेखनीय आणि इतरांना प्रेरित करणारे आहे, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी चैत्राम पवार यांचे कौतुक केले.