पुणे : राज्य सरकारच्या गृह विभागाने पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. याबाबत गृह विभागाने मंगळवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी आदेश काढले. शुक्ला यांचा कार्यकाळ ३ जानेवारी २०२६ पर्यंत राहील, असे आदेशात नमूद केले आहे.
राज्य सरकारने भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांची ४ जानेवारी २०२४ रोजी पोलिस महासंचालकपदी नियुक्ती केली होती. त्या जून महिन्यात सेवानिवृत्त होणार होत्या. त्यांचा ४ महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक होता. परंतु राज्य सरकार त्यांच्याबाबत सकारात्मक असल्यामुळे त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर शुक्ला यांना नियुक्तीपासून दोन वर्षांचा कार्यकाळ वाढवून देण्याबाबत गृह विभागाने आदेश काढले. रश्मी शुक्ला शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांनी यापूर्वी पुणे शहर पोलिस आयुक्त पदाचीही जबाबदारी पार पाडली आहे.