२९ जानेवारी ; द बंगाल गॅजेटचा पहिला अंक प्रकाशित

yongistan
By - YNG ONLINE

२९ जानेवारी रोजी ज्येष्ठ समाजवादी नेते, कामगार नेते, माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन.  जेम्स ऑगस्ट हिकी यांनी बंगाल गॅझेट हे भारतातील पहिले वृत्तपत्र सुरू केले. आजच्या दिवशी भारत दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनेचा प्रादेशिक भागीदार बनला.

१७८० : जेम्स ऑगस्ट हिकी यांनी भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅझेट इंग्रजी भाषेत प्रकाशित केले. इंग्रजीत प्रसिद्ध झालेल्या या वृत्तपत्राला द कलकत्ता जनरल अ‍ॅडव्हर्टायझर आणि हिकीज गॅझेट असेही म्हणतात. ते साप्ताहिक इंग्रजी वर्तमानपत्र होते. या वृत्तपत्राचे संपादक आणि प्रकाशक हिकी होते. बंगाल गॅझेटने भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांच्यावर चुकीच्या कारभाराचा आरोप केला होता. 

१९१६ : पहिल्या महायुद्धात जर्मनीने प्रथमच फ्रान्सवर हल्ला केला : पहिले महायुद्ध हे युरोपमधील एक जागतिक युद्ध होते. २८ जुलै १९१४ ते ११ नोव्हेंबर १९१८ पर्यंत हे युद्ध चालले होते. हा इतिहासातील सर्वात प्राणघातक संघर्षांपैकी एक होता. या युद्धात अंदाजे ९० दशलक्ष सैनिक आणि १३ दशलक्ष नागरिकांचा मृत्यू झाला होता. आजच्या दिवशी म्हणजे २९ जानेवारी १९१६ रोजी पहिल्या महायुद्धात जर्मनीने प्रथमच फ्रान्सवर हल्ला केला होता.

१९३९ : रामकृष्ण मिशन इन्स्टिट्यूट ऑफ कल्चरची स्थापना
रामकृष्ण मिशन इन्स्टिट्यूट ऑफ कल्चर ही रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन बेलूर मठ यांची एक शाखा आहे. रामकृष्ण मिशन इन्स्टिट्यूट ऑफ कल्चर ही संस्था कोलकाता येथे आहे. जगभरातील धर्मादाय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी ही प्रसिद्ध आहे.या संस्थेने जगभरातील संस्कृतींचे कौतुक करून, त्यांच्या समृद्धतेचे मूल्य आणि आदर करून एक प्रकारचे सांस्कृतिक आदान-प्रदान केले आहे. २९ जानेवारी १९३९ रोजी श्री रामकृष्ण यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त ही संस्था अस्तित्वात आली.

१९४९ : ब्रिटनने इस्रायलला मान्यता दिली 
इस्रायल हा नैऋत्य आशियातील एक देश आहे.  १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि पुन्हा २० व्या शतकाच्या सुरुवातीस युरोपमधील ज्यूंचा छळ झाल्यामुळे युरोपीय (आणि इतर) ज्यू जेरूसलेम आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशात पळून गेले. आधुनिक इस्रायल राज्याची स्थापना १९४८ मध्ये झाली. २९ जानेवारी १९४९ रोजी ब्रिटनने इस्रायलला मान्यता दिली. 

१९७९ : भारतातील पहिली जंबो ट्रेन सुरू झाली 
आजच्या दिवशी भारतातील पहिली जंबो ट्रेन (दोन इंजिन असलेली) तामिळनाडू एक्सप्रेसला नवी दिल्ली ते मद्रास (आताचे चेन्नई) हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

१९९२ : भारत आसियानचा प्रादेशिक भागीदार बनला
१९९२ मध्ये भारताला आसियानचा प्रादेशिक भागीदार होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. या कराराने व्यापार, गुंतवणूक आणि पर्यटन संबंधांना चालना दिली. भारताला १९९५ मध्ये पूर्ण संवाद भागीदार बनवण्यात आले होते. 

२०१० : भारत आणि रशिया यांच्यातील संयुक्त प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेल्या विमानाचे यशस्वी उड्डाण भारत आणि रशिया यांच्यातील संयुक्त प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेल्या पाचव्या आवृतीच्या लढाऊ विमानाने रशियाच्या सुदूर पूर्व भागात प्रथमच यशस्वीपणे चाचणी उड्डाण केले. 

२०१९ : समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन
आपल्या एका हाकेवर मुंबई बंद करणारे कामगार नेते, समाजवादी नेते आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे आजच्या दिवशी दीर्घ आजाराने निधन झाले. जॉर्ज फर्नांडिस भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते होते. त्यांनी १९९४ साली नितीशकुमार यांच्या सोबत समता पक्षाची स्थापना केली होती. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे.