जयस्वालचे विक्रमी द्विशतक

yongistan
By - YNG ONLINE


युवा सलामीवीरची यशस्वी कामगिरी
विशाखापट्टनम : वृत्तसंस्था
इंग्लंडविरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालने दि. ३ फेब्रुवारी रोजी वयाच्या २२ व्या वर्षी अनेक दिग्गजांना जे जमले नाही, ते करून दाखविले. येथील एसीए-वीडीसीए स्टेडियमवर सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुस-या कसोटीच्या दुस-या दिवशी यशस्वीने २७७ चेंडूत द्विशतक झळकावले. तो २०९ धावांवर बाद झाला. या खेळीने त्याने अनेक विक्रम मागे पडले.

सर्वांत कमी वयात द्विशतक
-यशस्वी जयस्वालने भारतीय भूमीवर सर्वात कमी वयात द्विशतक झळकवणारा युवा सलामीवीर होण्याचा मान मिळवला. यशस्वीने ही कामगिरी २२ वर्षे ३७ व्या दिवशी केली. 

कांबळीच्या नावावर विक्रम
कसोटीत भारतासाठी सर्वात कमी वयात द्विशतक करण्याचा विक्रम विनोद कांबळीच्या नावावर आहे. १९९३ साली २१ वर्षे आणि ३५ व्या दिवशी इंग्लंडविरुद्ध विनोदने ही कामगिरी केली होती. आता या यादीत यशस्वीचे नाव आले आहे. तो भारताकडून कसोटीत द्विशतक करणारा चौथा युवा फलंदाज ठरला.

चौथा डावखुरा फलंदाज
यशस्वी भारताकडून कसोटीत द्विशतक करणारा चौथा डावखुरा फलंदाज ठरला. याआधी सौरव गांगुली, विनोद कांबळी आणि गौतम गंभीर यांनी ही कामगिरी केली. भारतासाठी सर्वात कमी डावात द्विशतक करणा-या फलंदाजांच्या यादीत यशस्वीचा समावेश झाला. यशस्वीने १० डावात ही कामगिरी केली. या यादीत करुण नायर अव्वल स्थानी आहे. त्याने फक्त ३ डावात द्विशतक केले होते. चेतेश्वर पुजारने ९, सुनील गावस्कर यांनी ८, मयांक अग्रवालने ८ तर विनोद कांबळीने ४ डावात द्विशतक केले होते.

२५ फलंदाजांची द्विशतकी खेळी
भारताकडून कसोटीत आतापर्यंत एकूण २४ फलंदाजांनी द्विशतकी खेळी केली आहे. यात विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, विराट कोहली, चेतेश्वर पुजार, आदी खेळांडूचा समावेश होतो. या यादीत आता यशस्वीचा समावेश झाला असून भारताकडून द्विशतक करणारा तो २५ वा खेळाडू ठरला आहे.

गंभीरला टाकले मागे
या सामन्यात यशस्वीने गौतम गंभीरला मागे टाकले, त्याने २००६ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०६ धावा केल्या होत्या. या विक्रमाबाबत सौरव गांगुली अव्वल स्थानी आहे. त्याने २००७ साली बेंगळुरूविरुद्ध २३९ धावा केल्या होत्या. गांगुलीचा हा विक्रम आजवर कोणी मोडू शकले नाही.