कलापिनी कोमकली यांना संगीत नाटक पुरस्कार

yongistan
By - YNG ONLINE
नवी दिल्ली : विख्यात शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांना मंगळवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी संगीत नाटक पुरस्कार जाहीर झाला. तसेच प्रसिद्ध सतार वादक नीलाद्री कुमार यांनाही संगीत नाटक पुरस्कार जाहीर झाला. संगीत नाटक अकादमीच्या वतीने २०२३ या वर्षासाठी संगीत, नाटक, नृत्य क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा केली. १ लाख रुपये आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

कलापिनी कोमकली या हिंदूस्तानी शास्त्रीय संगीतातील अलौकिक स्वरतपस्वी पंडित कुमार गंधर्व यांची कन्या आहेत. आपल्याकडे असलेला सुरांचा अलौकिक ठेवा जपतानाच शास्त्रीय संगीतात त्यांनी स्वत:ची गायनशैली घडवली आहे. पंडित कुमार गंधर्व आणि वसुंधरा कोमकली या अत्यंत विलक्षण, प्रतिभावंत शास्त्रीय संगीत गायक दाम्पत्याची कन्या म्हणून कलापिनी यांच्याकडे पाहिले जाते. मात्र, कोणत्याही अपेक्षांचे दडपण न घेता वा आपल्या पूर्वसुरींच्या छायेत अडकून न राहता कलापिनी यांनी शास्त्रीय संगीतात स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यांच्या या गायनशैलीमुळे आता त्यांना संगीत नाटक पुरस्कार जाहीर झाला.
 
कुमार गंधर्व यांच्याकडून धडे
कलापिनी कोमकली यांनी कुमार गंधर्व यांच्याकडून गायनाचे धडे गिरवले तर आईकडून त्यांनी गायकीचे तंत्र शिकले. शास्त्रीय संगीताच्या अभ्यासात आणि स्वरसाधनेत रमलेल्या कलापिनी आज प्रतिभावंतांच्या पिढीची समर्थ प्रतिनिधी आणि प्रसिध्द शास्त्रीय गायिका म्हणून ओळखल्या जातात. ‘कुमार गंधर्व प्रतिष्ठान’च्या माध्यमातून शास्त्रीय संगीताच्या प्रचार-प्रसारासाठीही त्या कार्यरत आहेत. 

संगीतप्रवास
कलापिनी कोमकली शाळेत असताना लताबाई, आशाबाई यांची हिंदी गाणी गुणगुणत असे. त्यावेळी एवढाच त्यांचा गाण्याशी संबंध होता. चित्रपटसंगीतावर माझे त्यांचे फार प्रेम होते. अमीन सयानीची बिनाका गीतमाला त्यांना अतिप्रिय होती. लताबाई, आशाताई, महंमद रफी, किशोर कुमार हे त्यांचे अत्यंत आवडते गायक होते. पुढे त्यांना शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण झाली.