पहिली लोकसभा निवडणुक १९५१

yongistan
By - YNG ONLINE
२०२४ मध्ये १८ व्या लोकसभेची निवडणूक होत आहे. या निमित्ताने १७ लोकसभा निवडणुकांचा आढावा घेतला, तर ब-याच गोष्टी आणि निवडणुकांचा इतिहास, राजकीय घडामोडी आपल्याला समजणार आहेत. आगामी निवडणुकीत ५४८ खासदार निवडून देण्यासाठी देशातील जवळपास ९५ कोटी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्ष करतील. पहिल्या म्हणजे १९५१ मध्ये झालेल्या निवडणुकीपासून सुरु झालेला मतदानाचा सिलसिला ४५ ते ५५ टक्क्यांच्या आसपास आहे.

देशातील पहिली लोकसभा निवडणूक
१९५१ मध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे भारत नुकताच इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला होता  पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली घटना २६ जानेवारी १९५० पासून लागू करण्यात आली होती आणि भारत लोकशाहीप्रधान देश झाला होता. लोकशाही असल्याने लोकांनी देश चालवण्यासाठी खासदार आणि आमदार निवडून देणे बंधनकारक होते. त्यावेळी केंद्र सरकारसाठी खासदारांचीच निवड करायची होती, असे नाही तर देशातील राज्यांसाठी आमदारही निवडायचे होते. मतदारांची नोंद कशी करायची? मतदान केंद्र कशी उभी करायची? मतपत्रिका  ठेवण्यासाठी लागणा-या मोठ्या पेट्या कशा आणायच्या, त्याची सुरक्षा कशी करायची? मतदान घेण्यासाठी लागणारे मनुष्यबळ कसे निवडायचे, हा प्रश्न होता. 

देशात १९५१ ला निवडणूक होण्यापूर्वी जगात फक्त उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये अशा मोठ्या प्रमाणावर निवडणुका घेण्यात आल्या होत्या. मात्र या देशांमध्ये साक्षरतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांना निवडणूक घेणे तेवढे अवघड गेले नव्हते. या देशांत  सगळ््याच प्रौढ मतदारांना निवडणुकीत सामील करून घेण्यात आले नव्हते. महिलांना या मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले होते. भारतात मात्र असे करायचे नव्हते. सर्व पात्र मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करायचे होते. १९.३७ कोटी मतदारांपैकी ४७.७४ टक्के मतदार मतदानासाठी बाहेर पडले आणि देशात पहिले केंद्रीय सरकार आणि अनेक राज्यातील सरकारे अस्तित्वात आली. 

चार महिने निवडणूक
ही निवडणूक घेणे तेवढे सोपे नव्हते. आपल्याला काहीही अनुभव नव्हता. २५ ऑक्टोबर १९५१ ते २१ फेब्रुवारी १९५२ या चार महिन्यात ही निवडणूक पार पडली. १९५१ ची निवडणूक ही लोकसभा आणि विधानसभेसाठी झालेली देशातील पहिली निवडणूक होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका घेण्याच्या विचारात आहेत.

जगाला आश्चर्य वाटणारी निवडणूक
१९५१ च्या या निवडणुकीत लोकसभेच्या ४९७ आणि देशभरातील विधानसभेच्या ३२८३ जागांसाठी निवडणुका झाल्या होत्या. भारताने ऐतिहासिक प्रयोग केला आणि १९५१ च्या या निवडणुका पाहून सगळ््याच जगाला आश्चर्य वाटले होते. 

१९५१ मधील पहिले निवडणूक आयुक्त 
१९५१ मध्ये जवाहरलाल नेहरूंनी देशातील पहिल्या निवडणुकांची जबाबदारी सुकुमार सेन यांच्यावर सोपवली होती. सुकुमार सेन हे तत्कालीन माजी कायदा मंत्री अशोककुमार सेन यांचे ज्येष्ठ बंधू होते आणि ते एक कार्यक्षम सनदी अधिकारीही होते. त्यांचे संपूर्ण शिक्षण परदेशात झाले होते. भारतात आल्यावर त्यांनी सर्वप्रथम जिल्हाधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली, त्यानंतर ते पश्चिम बंगालचे मुख्य सचिव झाले आणि त्यानंतर त्यांच्याकडे मुख्य निवडणूक आयुक्तपद सोपवण्यात आले.  

देशातील विविध भागांचा अभ्यास करून मतदान केंद्र उभारण्यापासून ते मतपेट्या आणि त्या ठेवण्यासाठी केंद्र तयार करण्यापर्यंतचे सगळे नियोजन झाल्यानंतर त्यांनी मतदान कसे करायचे यासाठी मॉक ड्रिलही घेतले. देशातील जवळजवळ ८२ टक्के जनता निरक्षर असल्याने मतदारांची यादी तयार करताना अमुकची पत्नी, अमुकची आई अशी नोंद महिलांनी केली होती. अशा महिलांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली होती. मतदारांना उमेदवार ओळखता यावे यासाठी प्रत्येक उमेदवाराला निवडणूक चिन्ह देण्यात आले होते.  

देशातील पहिले मत, पहिला मतदार 
देशातील पहिले मत श्यामसरन नेगी यांनी हिमाचल प्रदेशमधील चिनी तहसील कार्यालयात दिले होते. याच श्यामसरन नेगी यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी निधन झाले. सर्व लोकसभा निवडणुकांसाठी मतदान करणारे ते सर्वात ज्येष्ठ मतदार होते. प्रत्येक बूथमध्ये लोकसभा आणि विधानसभेसाठी दोन पतपेट्या ठेवण्यात आल्या होत्या. निवडणूक आयोगाने लोखंडाच्या जवळ-जवळ सव्वा दोन कोटींच्या आसपास मतपेट्या तयार केल्या होत्या. राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात मतपेट्या पोहोचवण्याची व्यवस्था नसल्याने लष्कराच्या वाहनांमधून मतपेट्या मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी उंटांची मदत घेण्यात आली होती. त्रिपुरा आणि बर्मा सीमेवर हत्तीवर लादून मतपेट्या नेण्यात आल्या होत्या. निवडणुकांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी निवडणूक आयोगाने चित्रपटांची आणि  रेडिओची मदत घेतली होती. दोन निवडणुका यशस्वीपणे घेणा-या सुकुमार सेन यांचा १९५४ मध्ये पद्मविभूषण देऊन गौरव करण्यात आला होता.

पहिल्या निवडणुकीचा निकाल 
या निवडणुकीत काँग्रेसला ४९७ पैकी ३६४ जागांवर विजय मिळाला आणि पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान झाले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला १६ जागा मिळाल्या. सत्ताधारी काँग्रेसखालोखाल भाकपला जागा मिळाल्याने भाकप केंद्रातील मुख्य विरोधी पक्ष झाला होता. डॉ. लोहिया, जयप्रकाश नारायण आणि आचार्य देव यांच्या समाजवादी पार्टीला १२ जागा तर किसान मजदूर पार्टीला ९, हिंदू महासभेला ४ आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या भारतीय जनसंघाला 3 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादुर शास्त्री, सुचेता कृपलानी. गुलजÞारीलाल नंदा, काकासाहेब कालेलकर, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा विजय झाला. याच निवडणुकीत घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले होते.

विधानसभा निवडणुका
लोकसभेसोबतच बिहार, बॉम्बे, मद्रास, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि म्हैसूर अशा सात राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये सर्वच राज्यांमध्ये काँग्रेसने चांगलेच यश मिळवले होते. त्यानंतर राज्यांचा आकार छोटा करून राज्यांची संख्या वाढवण्यात आली.