तिसरी लोकसभा :नेहरूंची शेवटची निवडणूक १९६२

yongistan
By - YNG ONLINE
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पित्याने पक्ष स्थापन केला असेल तर मुलाला किंवा मुलीकडे पक्षाची जबाबदारी सोपवली जाते, त्यांना महत्वाची पदे दिली जातात, त्यांना आमदारकी, खासदारकी दिली जाते. कदाचित तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण १९६२ च्या निवडणुकीतही काँग्रेस पक्षावर म्हणजेच तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर घराणेशाहीचा आरोप झाला होता. 
असे असताना पंडित नेहरूंनी इंदिरा गांधी यांची १९५९ मध्ये काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली, त्यामुळे काही काँग्रेस नेते नाराज झाले. पंडित नेहरू एवढ्यावरच थांबले नव्हते तर त्यांनी इंदिरा गांधी यांच्या सांगण्यावरून केरळमधील कम्युनिस्ट सरकार बरखास्तही केले होते. त्यामुळे पंडित नेहरूंवर घराणेशाहीचा आरोप झाला. यात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पंडित नेहरूंचे जावई आणि इंदिरा गांधींचे पती फिरोज गांधी यांनी मुंदडा कांड उघडकीस आणले. एलआयसीने कोलकात्यातील उद्योगपती हरिदास मुंदडा यांच्या कंपन्यांमधील कोट्यवधी रुपयांचे शेअर्स एलआयसीने विकत घेतले होते. यामागे सरकारचा हस्तक्षेप होता. स्वत: फिरोज गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने नेहरूंसमोर अडचण निर्माण झाली. तत्कालीन अर्थमंत्री टी. टी. कृष्णाम्माचारी यांना राजीनामा द्यावा लागला. स्वतंत्र भारतातील हा पहिला आर्थिक घोटाळा होता. १९५७-५८ मध्ये फिरोज गांधी यांनी हा घोटाळा बाहेर काढला होता. मात्र, १९६२ च्या निवडणुकीआधीच म्हणजे १९६० मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने फिरोज गांधी यांचे निधन झाले.

सी. राजगोपालाचारी आणि 
मिनू मसानी यांची नवी पार्टी 
या अशा स्थितीत पंडित नेहरू तिस-या लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले. या निवडणुकीत निवडणूक आयोगाने बहुसदस्यीय पद्धत रद्द करून एक सदस्यीय पद्धत लागू केली आणि प्रथमच प्रत्येक मतदारसंघातून एकच सदस्य निवडून देण्याकरिता मतदान घेण्यात आले. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये काही भागांमध्ये एका जागेवरून दोन खासदार निवडून दिले जात होते. त्यापैकी एक सामान्य तर दुसरा एससी-एसटी प्रवर्गातील असे. १६ फेब्रुवारी ते ६ जून काँग्रेस आणि नेहरुंविराधोत लाट होती खरी, पण सक्षम विरोधी पक्ष समोर दिसत नव्हता.  त्याचवेळी राष्ट्रीय पटलावर स्वतंत्र पार्टी उदयास आली. स्वतंत्र भारतातील पहिले गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी आणि मिनू मसानी यांनी या पार्टीची स्थापना केली होती. स्वतंत्र पार्टीने १७३ जागांवर उमेदवार दिले त्यापैकी फक्त १८ जागांवर त्यांना विजय मिळाला आणि त्यांच्या ७५ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. स्वतंत्र पक्षाला ओरिसा, बिहार, राजस्थानमध्ये मतदारांचा चांगलाच पाठिंबा मिळाला होता. प्रादेशिक पक्षांपैकी अकाली दल आणि ओरिसातील आसाम गण परिषदेला त्यांच्या राज्यात चांगले यश मिळाले होते.  ४९४ लोकसभा जागांसाठी १९८५ उमेदवार मैदानात होते. काँग्रेसने ४८८ जागांवर उमेदवार दिले होते. मात्र यावेळी काँग्रेसच्या खासदारांची संख्या मागील निवडणुकीच्या तुलनेत कमी झाली आणि त्यांना फक्त ३६१ जागांवर विजय मिळाला. विशेष म्हणजे काँग्रेसच्या तीन उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती.

नेहरू पुन्हा एकदा 
पंतप्रधानपदी विराजमान
भारतीय कम्युनिस्ट पार्टीने तिस-या लोकसभेतही आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. त्यांना २९ जागा मिळाल्या. मागील लोकसभेत विरोधी पक्ष अस्तित्वात नव्हता, पण यावेळेला भारतीय कम्युनिस्ट पार्टीने विरोधी पक्षाची जागा मिळवली. स्वतंत्र पार्टीला १८, प्रजा-समाजवादी पार्टीला १२ आणि समाजवादी पार्टीला ६ जागा मिळाल्या. जनसंघाला मागील दोन निवडणुकांच्या तुलनेत या निवडणुकीत चांगले यश मिळाले. त्यांनी १९६ जागांवर उमेदवार दिले आणि त्यापैकी १४ जागांवर त्यांना विजय मिळवता आला. या निवडणुकीत शेतकरी आणि ग्रामीण पृष्ठभूमी असलेले अनेक उमेदवार खासदार म्हणून प्रथमच संसदेत पोहोचले. सामान्य माणूस संसदेच पोहोचण्यास याच निवडणुकीपासून सुरुवात झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

 फूलपूरमधून उभे असलेल्या पंडित नेहरूंसमोर डॉ. राम मनोहर लोहिया मैदानात होते. पंडित नेहरूंच्या रोज होणा-या खर्चावर आणि गोवा विजयावरून डॉ. लोहिया यांनी नेहरूंवर टीकेची झोड उठवली होती.  मात्र निवडणुकीत नेहरू यांना एकूण १ लाख १८ हजार ९३१ मते मिळाली तर डॉ. लोहिया यांना फक्त ५४ हजार ३६० मते मिळाली आणि पंडित नेहरूंनी डॉ. लोहिया यांच्यावर मात केली. त्यानंतर एक वर्षाने १९६३ मध्ये डॉ. लोहिया उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबादमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झाले आणि संसदेत पोहोचले. 
विशेष म्हणजे लोकसभेत जाताच डॉ. लोहिया यांनी पंतप्रधान नेहरू यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला. तो फेटाळला गेला. पण त्यावेळी डॉ. लोहिया यांनी केलेले भाषण प्रचंड गाजले होते. १९६२ च्या निवडणुकीत ६६ पैकी ३१ महिला उमेदवार निवडून आल्या आणि संसदेत पोहोचल्या. या निवडणुकीत प्रथमच हिमालचलचे वीरभद्र सिंह, पंजाबमधून बूटा सिंह लोकसभेत प्रथमच पोहोचले. पटियालातून जिंकलेले सरदार हुकूम सिंह लोकसभा अध्यक्ष बनले. सक्षम विरोधी पक्ष नसल्याने पंडित नेहरू पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान झाले.

वाजपेयी यांना पराभवाचा धक्का
या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मागील निवडणुकीत जिंकलेले अटलबिहारी वाजपेयी यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. ते बलरामपुर आणि लखनौ अशा दोन जागांवरून निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. बलरामपुरमधून त्यांना काँग्रेसच्या सुभद्रा जोशी आणि लखनौमधून काँग्रेसचेच बी. के. धवन यांनी पराभूत केले. तर उत्तर मुंबईत जे. बी. कृपलानी यांना काँग्रेसच्या व्ही. के. कृष्णमेनन यांनी पराभूत केले. लोकसभेच्या या तिस-या निवडणुकीत मतदारांची संख्या २१ कोटी ६४ लाखांवर पोहोचली होती, मात्र मतदान फक्त ११ कोटी ९९ लाख मतदारांनीच केले होते. म्हणजेच मतदानाची टक्केवारी ५५.४२ टक्के होती. या निवडणुकीवर सात कोटी ८० लाख रुपये खर्च आला होता.

महाराष्ट्राची पहिली निवडणूक
१ मे १९६० रोजÞी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यानंतर महाराष्ट्रासाठी विधानसभेची पहिलीच निवडणूक झाली. या निवडणुकीत विधानसभेचे २६४ मतदारसंघ होते, त्यापैकी २१५ जागांवर काँग्रेस विजयी झाली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर त्र्यंबक भराडे विधानसभा अध्यक्ष झाले. मात्र काही महिन्यातच यशवंतरावांना दिल्लीला जावे लागले आणि त्यांच्या जागी मारोतराव कन्नमवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. वर्षभरातच त्यांचे कार्यालयातच निधन झाले आणि नंतर वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. वसंतराव नाईक यांनी नंतर महाराष्ट्रात हरित आणि औद्योगिक क्रांती आणली. या निवडणुकीत दुस-या क्रमांकावर असलेल्या शेतकरी कामगार पक्षाकडे १५ जागा, प्रजा समाजवादी पक्षाला ९ जागा, कम्युनिस्ट पक्षाला ६, रिपब्लिकन पार्टीला १ आणि समाजवादी पक्षाला एक जागा मिळाली होती.