चेक प्रजासत्ताकची क्रिस्टिना ठरली यंदाची मिस वर्ल्ड

yongistan
By - YNG ONLINE
मुंबई : जवळपास दोन दशकांनंतर भारतात मिस वर्ल्ड स्पर्धेचा ग्रँड फिनाले पार पडला. मुंबईतील जिओ सेंटरमध्ये यासाठी जगभरातील सौंदर्यवती, फॅशन विश्वातले दिग्गज आणि मनोरंजन दुनियेतील तारे दाखल झाल्या होत्या. यंदा सा-यांचेच लक्ष अंतिम फेरी गाठलेल्या भारताच्या सिनी शेट्टीकडे लागले होते. पण मिस वर्ल्ड २०२४ या किताबावर चेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टिना पिस्कोव्हाने नाव कोरले तर लेबनॉनची यास्मिना उपविजेती ठरली. शनिवार, दि. ९ मार्च २०२४ रोजी ही स्पर्धा पार पडली.
या सोहळ््यासाठी बॉलीवूडकरांनीही हजेरी लावली. विशेष म्हणजे या सोहळ््याच्या परीक्षकांच्या खुर्चीत  क्रिती सॅनॉन आणि पूजा हेडगेसह अमृता फडणवीसदेखील बसल्या होत्या. मिस वर्ल्ड २०२४ स्पर्धेसाठी १२ जजचे पॅनल होते. यामध्ये  बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन, पूजा हेगडे यांच्यासह मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिया एव्हलिन मॉर्ले, अमृता फडणवीस, साजिद नाडियादवाला, माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचा समावेश होता. या सर्व सदस्यांनी मिस वर्ल्ड २०२४ या स्पर्धेचे परीक्षण केले असून अमृता फडणवीस यांनी यंदाची मिस वर्ल्ड निवडली. 
यंदाची मिस वर्ल्ड ठरली....
यंदाच्या या स्पर्धेत १२० स्पर्धकांनी भाग घेतला होता. या सर्वांना मागे सारत  क्रिस्टीना पिस्कोव्हाने विश्वसुंदरीचा किताब पटकावला. मागील वर्षी ही स्पर्धा पोलंडच्या कॅरोलिना बिलावस्का हिने जिंकली होती. सिनी शेट्टीने भारताचे प्रतिनिधीत्व केले. पण तिला विजेतेपदावर नाव कोरता आले नाही. सिनी ही टॉप ८ पर्यंत पोहोचली. पण तिला टॉप ४ मध्ये भाग घेता आला नाही.