चांद्रयान ३ लॅंडिंग स्थळाचे नाव शिवशक्ती जगमान्य

yongistan
By - YNG ONLINE

आयएयूचे शिक्कामोर्तब, इस्रोचा सन्मान वाढला 
बंगळूरू : वृत्तसंस्था
२३ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अभूतपूर्व कामगिरी करत महत्त्वाकांक्षी चांद्रयान-३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले. या मोहिमेचे जगभरातून कौतुक झाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे कौतुक करताना चंद्रयान ३ ज्या ठिकाणी उतरले, त्या लँडिंग साइटला ‘शिवशक्ती’ हे नाव दिले. आंतरराष्ट्रीय संघटनेने दि. २४ मार्च २०२४ रोजी या नावावर शिक्कामोर्तब केले. 
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-३ लँडिंग साइटला ‘शिवशक्ती’ म्हटले जाईल, अशी घोषणा केली होती. तसेच चांद्रयान-२ च्या पाऊलखुणा ज्या बिंदूवर उमटल्या, त्याला ‘तिरंगा’ म्हटले जाईल. भारताच्या प्रत्येक प्रयत्नासाठी प्रेरणा म्हणून काम करेल. कोणतेही अपयश हे कोणत्याही गोष्टीची अखेर नसते, याची आठवण करून देईल. शिवामध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे तर शक्ती ते संकल्प पूर्ण करण्याचे सामर्थ्य आपल्याला देते. चंद्राचा हा शिवशक्ती बिंदू हिमालय आणि कन्याकुमारीशी जोडल्याची भावना असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.  चांद्रयान ३ मोहिमेच्या ऐतिहासिक यशाच्या सात महिन्यांनी आता आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघ म्हणजेच आययूएने पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या ‘शिवशक्ती’ या नावावर आयएयूने शिक्कामोर्तब केले.  
भारताचा सन्मान
 प्लॅनेटरी नामांकनानुसार आययूए वर्किंग ग्रुप फॉर प्लॅनेटरी सिस्टिम नामांकनाने चांद्रयान ३ चे विक्रम लँडर जिथे उतरले, त्या लँडिंग साइटच्या ‘शिवशक्ती’ नावाला मान्यता दिलेली आहे. यानंतर आता अधिकृतरित्या जगभरात चांद्रयान-३ जिथे उतरले, ते ठिकाण ‘शिवशक्ती’ नावाने ओळखले जाणार आहे. भारतासाठी हा मोठा सन्मान आहे. शिवशक्ती आणि तिरंगा पॉइंट दोन्ही नाव भारतीयच आहेत, अशी प्रतिक्रिया इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी त्यावेळी दिली होती.