लोकसभेची दुसरी निवडणूक, ३७१ जागांवर विजय

yongistan
By - YNG ONLINE
(१९५७, पंडित नेहरू)
१९५६  मध्ये भाषेच्या आधारावर देशातील काही राज्यांची रचना झाली. राज्यांची संख्याही वाढली आणि १९५७ मध्ये देशातील दुसरी सार्वत्रिक निवडणूक झाली. यावेळी मतदारांची संख्याही जवळजवळ २ कोटींनी वाढली.  या निवडणुकीत जवळ जवळ ४९ टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १९ जानेवारी ते १ मार्च १९५७ दरम्यान झालेल्या या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा करिश्मा कायम राहिला. पहिल्यापेक्षा या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढली आणि जागांची संख्याही वाढली.
 या निवडणुकीत ४९४  जागांसाठी १५  राजकीय पक्षांनी ९१९  उमेदवार मैदानात उतरवले होते. याशिवाय प्रादेशिक पक्षांनी ११९  आणि अपक्ष उमेदवार म्हणून ४९०  उमेदवार मैदानात होते. काँग्रेसने ४९०  उमेदवार मैदानात उतरवले होते आणि त्यापैकी ३७१ जागांवर यश मिळवले होते. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी काँग्रेसच्या निवडणुकीची संपूर्ण तयारी मोरारजी देसाई यांनी केली होती. स्वत: मोरारजी देसाई त्यावेळी बॉम्बे स्टेटमधील सूरत मतदारसंघातून तब्बल ८२.९८  टक्के मते प्राप्त केली होती. हा देशातील सगळ््यात मोठा विजय होता. मोरारजी देसाई यांनी १ लाख ९०  हजार ५६३  मते मिळाली होती तर त्यांच्यासमोर निवडणूक लढवलेल्या अपक्ष उमेदवार डी. किशनलाल यांना फक्त ३९ हजार ७६ मते मिळाली होती. या दोघांमधील मतांचे अंतर ६५ टक्क्यांपेक्षा जास्त होते. 

निवडणूक लढवलेल्या पक्षांमध्ये फूट
१९५१  मध्ये विरोधी पक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या पक्षांमध्ये या निवडणुकीत फूट पडली होती. आचार्य जे. बी. कृपलानी यांची किसान मजदूर प्रजा पार्टी आणि जयप्रकाश लोहिया यांची सोशलिस्ट पार्टी यांचे विभाजन झाले आणि नवा प्रजा सोशलिस्ट पार्टी या नावाने नवा पक्ष उदयास आला. मात्र त्यांना या निवडणुकीत म्हणावे तसे यश मिळाले नाही. पहिल्या निवडणुकांप्रमाणेच भारतीय कम्युन्स्टि पार्टीने ११० जागा लढवल्या आणि ९ टक्के मते मिळवत २७ जागांवर यश मिळवले तर प्रजा सोशलिस्ट पार्टीने १८९ जागी उमेदवार उभे केले. मात्र त्यांना फक्त १९ जागांवर यश मिळवता आले. त्यांच्या वाट्याला १०.४ टक्के मते आली होती. जनसंघाने या निवडणुकीत १३० उमेदवार मैदानात उतरवले होते त्यापैकी फक्त ४ जागांवर त्यांना विजय मिळाला होता आणि मतांची टक्केवारी फक्त ३ टक्के होती. जनसंघाच्या ५७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती.. तर ११९ मतदारसंघातून प्रादेशिक पक्षाचे उमेदवार उभे होते आणि त्यापैकी ३१ जागांवर त्यांना यश मिळाले होते. 

निवडणुकीत ४५ महिला उमेदवार मैदानात
या निवडणुकीतच तामिळनाडूमध्ये द्रविड मुनेत्र कळघम, ओरिसात गणतंत्र परिषद. बिहारमध्ये झारखंड पार्टी, महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र समिती आणि महागुजरात परिषद असे पाच प्रादेशिक पक्ष उदयास आले होते. विशेष म्हणजे या निवडणुकीत ४५ महिला उमेदवार मैदानात होत्या आणि त्यापैकी २२ महिला लोकसभेवर खासदार म्हणून  निवडून गेल्या होत्या. ग्वाल्हेर राजघराण्याच्या विजयाराजे शिंदे गुना मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या आणि खासदार म्हणून राज्यसभेत पोहोचल्या. पश्चिम बंगालमधील बशीरहाट मतदारसंघातून रेणू चक्रवर्ती आणि अंबालामधून सुभद्रा जोशी दुस-यांदा लोकसभा निवडणूक जिंकून खासदार म्हणून दिल्लीत पोहोचल्या होत्या. सीतापूरमधून उमा नेहरूंनीही १९५१ निवडणूक जिंकली होती.

 वाजपेयी, शास्त्री, देसाईंचा विजय
या निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी, लालबहादुर शास्त्री आणि मोरारजी देसाई यांचा विजय झाला आणि पुढे तिघेही देशाचे पंतप्रधान झाले. अटलबिहारी वाजपेयी यांनी उत्तर प्रदेशमधील बलरामपूर, लखनौ आणि मथुरा या तीन ठिकाणांहून लोकसभेची निवडणूक लढवली होती. लखनौ आणि मथुरामध्ये त्यांचा पराभव झाला तर बलरामपूरमध्ये त्यांचा विजय झाला. लखनौ मतदारसंघात त्यांचा काँग्रेसच्या पुलीन बिहारी बॅनर्जी यांनी पराभव केला. मथुरा मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजा महिंद्र प्रताप यांनी त्यांचा पराभव केला. मद्रासमधील तंजावर लोकसभा मतदारसंघातून सी. आर. व्यंकटरमण निवडून आले होते जे नंतर देशाचे राष्ट्रपती झाले. जे. बी. कृपलानी बिहारमधील सीतामढी तर कम्युनिस्ट नेते श्रीपाद डांगे मुंबई मध्य मतदारसंघातून खासदार म्हणून केंद्रात पोहोचले होते. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे जावई आणि इंदिरा गांधींचे पती फिरोज गांधी रायबरेलीतून निवडून आले होते. गुडगावमधून मौलाना अब्दुल कलाम आझाद निवडून आले होते.

विरोधी पक्षच अस्तित्वात नव्हता
दुसरीकडे डॉ. राममनोहर लोहिया यांचा उत्तर प्रदेशातील चंदोली मतदारसंघातून काँग्रेसचे त्रिभुवन  नारायण सिंह यांनी पराभव केला होता. व्ही. बी, गिरी यांचा आंध्र प्रदेशातील पार्वतीपूरमध्ये पराभव झाला होता तर पीसीएचच्या तिकिटावर रसडा मतदारसंघातून चंद्रशेखर यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यांचा पराभव झाला होता. ते तिस-या क्रमांकावर फेकले गेले होते. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यावेळी विरोधी पक्षच अस्तित्वात आला नाही. याचे कारण म्हणजे निवडणूक लढवलेल्या एकाही पक्षाकडे विरोधी पक्षासाठी आवश्यक असलेल्या खासदारांची संख्या नव्हती. १९५७ च्या निवडणुकीत काँग्रेसला प्रथमच केरळमध्ये झटका बसला. केरळमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत बिगर काँग्रेसी म्हणजे साम्यवादी पक्षाचे सरकार सत्तेवर आले.

मराठी भाषिक राज्यासाठी 
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ
महाराष्ट्रात राज्य पुनर्रचनेनंतर कच्छ, सौराष्ट्र, मध्य प्रांतातील नागपूर, हैदराबादमधील मराठवाडा हा भाग जोडून बॉम्बे जिल्हा तयार करण्यात आला होता. नवे भाग जोडल्यामुळे विधानसभेतील सदस्यांची संख्या ३१५ वरून ३९६ वर गेली होती. यावेळी काही मतदारसंघ द्विसदस्यीय तर काही त्रिसदस्यीय होते. मराठी भाषिक राज्यासाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ महाराष्ट्रात सुरु झाली होती. मुंबई प्रांताच्या या निवडणुकीत काँग्रेसला चांगलाच फटका बसला होता. त्यांच्या आमदारांची संख्या २३४ वर आली होती. १९५१ च्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसला ३१५ पैकी २६९  जागा मिळाल्या होत्या. प्रथमच अस्तित्वात आलेल्या संयुक्त महाराष्ट्र समिती आणि प्रजा समाजवादी पार्टीने १०० च्या आसपास जागा जिंकल्या होत्या. मात्र काँग्रेसने गुजरात, विदर्भ आणि मराठवाड्यात चांगले यश मिळाल्याने त्यांना सत्ता कायम राखणे शक्य झाले होते.

मुंबई प्रांतांच्या पहिल्या निवडणुकीत 
काँग्रेसचा २६९ जागांवर विजय
राज्य पुनर्रचनेनंतर तेव्हाच्या बॉम्बे प्रांतात कच्छ आणि सौराष्ट्र, मध्य प्रांतातील नागपूर, हैदराबादमधील मराठवाडा हा भाग जोडला गेल्याने मतदारसंघांची संख्या ३१५ वरून ३९६ वर गेली होती. काही मतदारसंघ त्रिसदस्सीय तर काही द्विसदस्यीय होते. मराठी भाषिक राज्यासाठी चळवळ सुरु झाली होती. मुंबई प्रांतांच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने ३१५ पैकी २६९ जागांवर विजय मिळवला. संयुक्त महाराष्ट्र समिती आणि प्रजा समाजवादी पार्टीने जवळपास १०० जागा जिंकल्या होत्या. याच काळात मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण काम पाहात होते.