नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत सरकारकडून सर्वाधिक वेतन कुणाला दिले जाते. यामध्ये पंतप्रधानांचा कितवा क्रमांक लागतो, याची चर्चा नेहमीच होते. पंतप्रधान देशाचा कारभार हाकतात, मग त्यांना वेतन किती असेल, याची उत्सुकता सर्वांनाच असते. परंतु पंतप्रधान सर्वोच्च वेतनात पाचव्या क्रमांकावर आहेत. मग सर्वाधिक वेतनात कोणाचा पहिला क्रमांक लागतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. यामध्ये पहिल्या चारमध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि सरन्यायाधीश यांचा क्रमांक लागतो.
भारत सरकार सर्वाधिक वेतन राष्ट्रपतींना देते. राष्ट्रपतींना दरमहा ५.९ लाख रुपये वेतन मिळते. याशिवाय सर्व प्रकारचे भत्ते, सरकारी निवासस्थान म्हणून राष्ट्रपती भवन, सरकारी वाहने, २४ तास सुरक्षा कर्मचारी आणि मोठा कर्मचारी स्टाफ असतो. यात उपराष्ट्रपती दुस-या क्रमांकावर आहेत. त्यांना ४ लाख रुपये वेतन मिळते. याशिवाय अनेक प्रकारचे भत्ते, मोठे बंगले, आलिशान गाड्या, २४ तास सुरक्षा कर्मचारी, वैद्यकीय सुविधा मिळतात. तिसरा क्रमांक राज्यपालांचा लागतो. भारत सरकार त्यांना ३.५ लाख रुपये मासिक वेतन देते. याशिवाय प्रत्येक राज्यात राज्यपालांसाठी आलिशान बंगला, सुरक्षा कर्मचारी, नोकर आदी सुविधाही दिल्या जातात.
चौथ्या क्रमांकावर भारताचे सरन्यायाधीश असतात. सरन्यायाधीशांना २.८ लाख रुपये वेतन मिळते. याशिवाय राजधानी दिल्लीत भाड्याने मोफत बंगला, २४ तास सुरक्षा कर्मचारी, कार यासारख्या सुविधा दिल्या जातात. वेतनात पाचव्या क्रमांकावर पंतप्रधान येतात. त्यांना दरमहा १.६६ लाख रुपये पगार मिळतो. यात सर्व प्रकारचे भत्तेदेखील असतात. सरकारी निवासस्थानाव्यतिरिक्त एसपीजी सुरक्षा, विशेष जहाजे, बुलेट प्रुफ वाहने आणि सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात.