द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मानधनाचा विक्रम

yongistan
By - YNG ONLINE

बंगळुरू : वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ भारतीय दौ-यावर आला असून, दि. १६ जूनपासून ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू झाली. बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियवर झालेल्या पहिल्याच सामन्यात भारताच्या स्मृती मानधनाने शानदार शतक ठोकत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. तिने १२७ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकारासह ११७ धावांची खेळी केली. हे तिचे वनडे कारकिर्दीतील ६ वे शतक ठरले. यासह तिने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ७ हजार धावांचा टप्पाही पार केला. 

मानधना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७ हजार धावा करणारी जगातील सहावी आणि भारतातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. भारताकडून या पूर्वीअसा विक्रम मिताली राजने केला आहे. यासोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर शारलोट एडवर्डस, सुझी बेटस्, स्टिफानी टेलर, मेग लेनिंग या महिला क्रिकेटपटूंनी ७ हजार धावांचा टप्पा पार केला. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा विक्रम स्मृती मानधनाच्या नावावर आहे. तिने २०१८ मध्ये किम्बर्ली येथे १३५ धावा केल्या होत्या आणि त्यानंतर तिच्या आजच्या ११७ धावांच्या खेळीचा विक्रम येतो. पुनम राऊतने २०२१ मध्ये लखनौ येथे नाबाद १०४ धावा केल्या होत्या. यासोबतच बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिल्या वहिल्या शतकवीर महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा विक्रम स्मृती मानधनाच्या नावावर नोंदवला गेला आहे.

हरमनप्रीतला टाकले मागे
स्मृती मानधानाने ६ वे शतक ठोकून कर्णधार हरमनप्रीत कौरच्या ५ शतकाच्या विक्रमाला मागे टाकले. वनडेत महिला संघाकडून सर्वाधिक वनडे शतके करणा-या खेळाडूंच्या यादीत स्मृती दुस-या क्रमांकावर आली, तर ७ शतकांसह मिताली राज अव्वल स्थानावर आहे.