मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विधानसभा निवडणुकांआधी राज्यातील नागरिकांना मोठे गिफ्ट दिले आहे. आता राज्यातील नवी आरोग्य विमा योजना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना सर्वांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारने या योजनेचा वार्षिक प्रीमियम ६० टक्क्यांनी वाढवून तो ३००० कोटी रुपयांहून अधिक केला आहे. नवी योजना १ जुलै २०२४ पासून लागू होणार आहे.
नव्या आरोग्य विमा योजनेअंतर्गत राज्यातील सर्व नागरिकांना आता दीड लाखांऐवजी पाच लाख रुपयांचा विमा कव्हर मिळेल. २०१२ मध्ये ही योजना लाँच करण्यात आली होती. त्यानंतर आता १२ वर्षांनी या योजनेत इतका मोठा बदल करण्यात आला. या योजनेसाठी राज्य सरकारने नुकतीच निविदा प्रक्रिया निकाली काढली आहे. यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी युनायटेड इंडिया इन्शूरन्सची निवड करण्यात आली आहे. राज्यातील १२.३ कोटी कुटुंबांसाठी सरकार प्रतिकुटुंब १३०० रुपये प्रीमियम भरणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार २०२३-२४ मध्ये ५.७ लाख कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला.