नागपूर : भारतीय लष्कराने आत्मनिर्भरतेच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकेल असून, स्वदेशी बनावटीचे आत्मघाती ड्रोन नागास्त्र-१ हे भारतीय लष्कराच्या भात्यात समाविष्ट झाले आहे. नागपूरस्थित कंपनी सोलर इंडस्ट्रीजच्या इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लि. युनिटने याची निर्मिती केली.
लष्कराने अशा प्रकारच्या ४८० ड्रोनची ऑर्डर दिली होती. आतापर्यंत १२० ड्रोनची डिलिव्हरी पूर्ण झाली आहे. सायलेंट मोडमध्ये १२०० मीटर उंचीवर हे ड्रोन उड्डाण करू शकतात. शत्रू राष्ट्राच्या हद्दीत अलगद प्रवेश करीत लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता नागास्त्र-१ मध्ये आहे.
ड्रोनची वैशिष्ट्ये
३० कि.मी. मारक क्षमता
६० मिनिटांपर्यंत हवेत राहू शकते.
२ कि. ग्रॅ.पर्यंतची स्फोटके वाहून नेण्याची क्षमता
लक्ष्यभेद न झाल्यास माघारी बोलावता येते.
शत्रू राष्ट्रांची प्रशिक्षण केंद्रे आणि दहशतवादी ठाणी यावर थेट प्रहार करता येते.
अमेरिकेने दिले होते ड्रोन
अमेरिकेने चार महिन्यांपूर्वीच भारताला ३१ एमक्यू ९ बी हे ड्रोन देण्याचा निर्णय घेतला होता. या ड्रोनची किंमत ३.९९ अब्ज डॉलर म्हणजेच ३३ हजार कोटी रुपये एवढी आहे. चीनला लागून असलेली प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि भारताची सागरी हद्द याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी या ड्रोनचा वापर होणार आहे.