१७ केंद्रीय मंत्र्यांचा पराभव

yongistan
By - YNG ONLINE
लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार २.० च्या १७ केंद्रीय मंत्र्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यामध्ये महाराष्ट्रातील रावसाहेब दानवे, डॉ. भारती पवार, कपिल पाटील यांचा समावेश आहे. आता या माजी मंत्र्यांना सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस बजावली आहे. या माजी मंत्र्यांकडे बंगला रिकामा करण्यासाठी ११ जुलैपर्यंत वेळ आहे. माजी मंत्र्यांना ११ जुलैपर्यंत तर माजी खासदारांना ५ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. नियमानुसार निवडणूक निकालानंतर महिनाभरात बंगले खाली करावे लागतात.
राष्ट्रपतींनी ५ जून रोजीच १७ वी लोकसभा विसर्जित केली. १८ व्या लोकसभेत जे मंत्री निवडणूक जिंकू शकले नाहीत, यामध्ये महेंद्रसिंग पांडे, स्मृती इराणी, संजीव बल्याण, भानुप्रताप वर्मा, अजय मिश्रा टेनी, कौशल किशोर, साध्वी निरंजन ज्योती या उत्तर प्रदेशातील नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय आर. के. सिंह, अर्जुन मुंडा, राजीव चंद्रशेखर, व्ही. मुरलीधरन, कैलास चौधरी या माजी मंत्र्यांसह माजी खासदार निशित प्रामाणिक, माजी खा. सुभाष सरकार, भगवंत खुबा यांनाही नोटीस बजावली. त्यामुळे भाजपच्या या माजी खासदार, माजी मंत्र्यांना बंगले खाली करावे लागणार आहेत.