नीटच्या ग्रेस गुणांचा सावळागोंधळ

yongistan
By - YNG ONLINE
नीटच्या परीक्षेत १५६३ विद्यार्थ्यांना ग्रेस गुण दिले गेले आणि यात तब्बल ७२० पैकी ७२० गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ६३ वर पोहोचली. खरे म्हणजे नीटमध्ये निगेटिव्ह मार्क सिस्टम असल्यामुळे पैकीच्या पैकी गुण मिळणे सोपी गोष्ट नाही, तरीही ६३ विद्यार्थ्यांना सर्वच्या सर्व म्हणजे ७२० गुण मिळाले. तसेच ७०० गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांची संख्या २ हजारांच्या जवळपास आहे, तर साडेसहाशेच्या पुढे गुण मिळविणारे विद्यार्थी तर ४० हजारांवर आहेत. ही आकडेवारी पाहता नीट परीक्षेबाबतही आता संशय निर्माण झाला आहे. कारण ग्रेस गुणाच्या नावाखाली जर अशी गुणवत्तेची उधळण होत असेल आणि त्यांचा सहज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नंबर लागत असेल, तर इतर प्रामाणिकपणे कष्ट करणा-यांचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. 
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशांसाठी ‘नीट’ परीक्षा घेतली जाते. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या देशभरातील लाखभर जागांसाठीच्या प्रवेशासाठी ही परीक्षा होते. या परीक्षेला यंदा सुमारे २३ लाख विद्यार्थी बसले. या परीक्षेचा निकाल अनेकांसाठी अजूनही ‘अनाकलनीय’ आहे. परीक्षेत ७२० पैकी ७२० गुण मिळवलेल्यांची संख्या ६७ इतकी आहे. त्यानंतरच्या प्रत्येक गुणासाठी एवढी स्पर्धा आहे की ७२० पैकी ७०० गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीतील क्रमांक १९९३ आहे. हे अत्यंत विचित्र अशासाठी की देशातील आघाडीच्या दिल्लीतील ‘एम्स’मध्ये १२५ जागा उपलब्ध असताना तेथील प्रवेशासाठी प्रयत्न करणा-या विद्यार्थ्याला ७०० गुण मिळवूनही तेथे प्रवेशाची शाश्वती नाही. धक्कादायक म्हणजे ७२० पैकी ६४८ गुण मिळवलेल्याचा गुणानुक्रम ४०,००० च्या पुढे आहे. याचा अर्थ परीक्षेत ९० टक्के गुण मिळवूनही सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेलच, याची शाश्वती नाही.
हा प्रकार समोर येताच पेपर फुटल्यापासून निकाल नियोजित वेळेच्या आधी लावल्यापर्यंतच्या शंका व्यक्त केल्या गेल्या आहेत. काहींनी न्यायालयातही दाद मागितली. आता यावर ८ जुलै रोजी सर्वच याचिकांवर संयुक्त सुनावणी होणार आहे. आता या गोंधळाची सीबीआय चौकशीचीही मागणी होत आहे. ही मागणीही सुप्रीम कोर्टाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक चिघळत जाण्याची शक्यता आहे. परंतु प्रवेश प्रक्रिया रखडू नये, म्हणून सुप्रीम कोर्टाने काऊंसिलिंग सुरूच ठेवण्यास मुभा दिली आहे. मात्र, एनटीएने आता १५६३ विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण रद्द केल्याने आता या विद्यार्थ्यांना एक तर डबल परीक्षा द्यावी लागेल किंवा ग्रेस गुण वगळता जे गुण मिळाले, ते स्वीकारून शांत बसावे लागेल. पुनर्परीक्षा द्यायची झाल्यास ही परीक्षाही २३ जूनला ठेवण्यात आली आहे. 
गेल्या २०-२५ वर्षांत देशभरात जसजशा अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नवनव्या प्रवेश परीक्षा निर्माण झाल्या, तसतशी या प्रवेश परीक्षांत ‘हमखास यश’ मिळवून देणारी शिकवणी वर्गांची समांतर व्यवस्थाही निर्माण होत गेली. आता तर या परीक्षांतील यशापयश या व्यवस्थेच्या हातात असण्यापर्यंतची वेळ आली आहे. देशभरात शाखा असलेल्या अनेक शिकवणी वर्गांची आर्थिक उलाढाल काही हजार कोटींपर्यंत असणे, हे त्याचेच निदर्शक. विद्यार्थ्यांना ‘हमखास यश’ मिळवून देणा-या या ‘कारखान्यां’नीच प्रवेश परीक्षा सोडविण्याचे तंत्र विकसित केले. आधीच्या काही वर्षांत आलेल्या हजारो प्रश्नांची हजारो उत्तरे चक्क पाठ करणे, हे यातील प्रमुख तंत्र! दर वर्षी आधीच्या वर्षी झालेल्या परीक्षांतील प्रश्न वेगळ््या पद्धतीने पुन्हा येत असल्याने त्यांचा व्यवस्थित सराव केला, की काम फत्ते. ज्याचा दोन वर्षांत पुरेसा सराव होत नाही, त्याला चक्क ‘ड्रॉप’ घेऊन पुढच्या वर्षीच्या परीक्षेला बसायला सांगितले जाते तर ज्याचे गुण अपेक्षेपेक्षा कमी येतात, तोही पुन्हा एक वर्ष ‘त्याग’ करून पुन्हा ही परीक्षा देतो. 
अशा परीक्षा सोडविण्याचे तंत्र माहीत असलेल्या पुनर्परीक्षार्थ्यांमुळेही एकूण ‘गुण’वंतांची संख्या वाढते. या सगळ््यात शिक्षकाने विद्यार्थ्याला संकल्पना समजावून सांगणे, त्यातील बारकाव्यांची उकल करणे, त्या संकल्पनेचे प्रत्यक्ष जीवनातील, उद्योगांतील उपयोजन रोचक पद्धतीने उलगडणे असे काही नसते. अकरावी-बारावीला कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेण्याऐवजी ‘इंटिग्रेटेड’ अशा गोंडस नावाखाली एखाद्या कनिष्ठ महाविद्यालयाशी ‘सामंजस्य’ करार केलेल्या शिकवणी वर्गातच प्रवेश घ्यायचा आणि दोन वर्षे त्या चार भिंतींत, दिलेल्या नोट्सची सकाळ-संध्याकाळ घोकंपट्टी करायची, अशी एक समांतर व्यवस्थाच अस्तित्वात आली आहे. त्यातच नीटसारख्या परीक्षेतही ग्रेस मार्काच्या नावाखाली जो सावळागोंधळ झाला. हे शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवणारे आहे. कारण लाखो रुपये देऊन ग्रेस गुण मिळविल्याचा प्रकारही समोर येत आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातही भ्रष्ट व्यवस्था किती खोलवर गेली आहे, याचा अंदाज येतो. असे होत असेल तर ज्यांनी नीटमध्ये यश मिळविण्यासाठी रात्र-दिवस परिश्रम घेतले असेल आणि त्यातूनही कमी गुण मिळालेले असतील, त्यांनी डॉक्टरची स्वप्ने कशी पाहायची आणि यात भ्रष्ट व्यवस्था जर घुसली असेल, तर खरेच डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार होणार का, यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हा वाद चिघळला आहे.