सेंट लुशिया : वृत्तसंस्था
रोहित शर्माने करो या मरो सामन्यात ऑस्ट्रेलियाची चांगलीच धुलाई केली आणि इतिहास रचला. जे कोणालाही जमले नाही, ते रोहितने करून दाखवले. मिचेल स्टार्कच्या एका षटकात तर ४ षटकार आणि १ चौकार लगावला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला आणि टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील २०० षटकार लगावणारा तो जगभरातील पहिलाच खळाडू ठरला.
विक्रमी २०० षटकार ठोकणारा तो एकमेव फलंदाज ठरला. त्याच्या मागे मार्टिन गुप्टिल १७३, जॉस बटलर १३७, ग्लेन मॅक्सवेल १३३, निकोलस पुरन १३२ षटकार ठोकणा-या फलंदाजांची नावे आहेत. टी-व्टेंटी वर्ल्डकप २०२४ मधील सुपर-८ मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने अनेक विक्रम नोंदविले. त्याने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याचे हे ट्वेंटी-२० तील तिसरे वेगवान अर्धशतक ठरले. त्याने युवराजसिंगचा २० चेंडूत अर्धशतकाचा २००७ चा विक्रम मोडित काढला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये रोहितने २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ७९ धावा ठोकल्या होत्या. आज त्याने वैयक्तिक ९२ धावा करीत स्वत:चाच विक्रम मोडित काढला.