नालंदा विद्यापीठ नव्या रूपात

yongistan
By - YNG ONLINE
१६०० वर्षांचा वारसा, १७४९ कोटी रुपये खर्चून विद्यापीठाचे पुनर्निर्माण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, दि. १९ जून २०२४ रोजी बिहारमधील नालंदा विद्यापीठ परिसरातील शैक्षणिक वास्तूचे उद्घाटन केले. तब्बल १७४९ कोटी रुपये खर्चून उभ्या केलेल्या या वास्तूला भारतातील १६०० वर्षांचा इतिहास लाभला आहे. बिहारमधील एकेकाळचे आशिया खंडातील ज्ञानाचे केंद्र असलेल्या या प्राचिन भारतातील नालंदा विद्यापीठाचे पुनर्निर्माण करण्यात आले. २०१६ मध्ये नालंदाचे अवशेष संयुक्त राष्ट्राने वारसा स्थळ घोषित केले. त्यानंतर २०१७ मध्ये विद्यापीठाचे बांधकाम सुरू केले.
नालंदाच्या प्राचीन अवशेषांजवळ विद्यापीठाचा नवीन परिसर बांधण्यात आला आहे. या नवीन कॅम्पसची स्थापना नालंदा विद्यापीठ कायदा २०१० द्वारे करण्यात आली. २००७ मध्ये फिलिपिन्समध्ये झालेल्या दुस-या पूर्व आशिया शिखर परिषदेत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी या कायद्याची तरतूद करण्यात आली. 
बौद्ध चिनी प्रवासी  ुएन त्संग इसवी सनाच्या सहाव्या शतकात भारतात आला. त्यावेळी तो या ठिकाणी वास्तव्यास होता. त्याने लिहिल्याप्रमाणे हे विद्यापीठ त्याकाळी एक आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे केंद्र होते. त्याने यासंबंधी लिहून ठेवलेल्या विद्यापीठांसंबंधीच्या नोंदींआधारे १९१५ ते १९१९ या दरम्यान भारतीय पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात या ऐतिहासिक विद्यापीठाचे अवशेष सापडले होते. आशिया खंडातील ज्ञानाचे केंद्र असलेल्या या केंद्राचे आता पुनरुज्जीवन करण्यात आले असून पुरातत्वीय स्थळापासून काही अंतरावर हे नवे केंद्र उभारण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधील राजगीर येथे या विद्यापीठाचे उद्घाटन केले. ८०० वर्षांपूर्वी परकीय आक्रमणात हे विद्यापीठ नष्ट करण्यात आले होते. त्याठिकाणी नवीन विद्यापीठाच्या कॅम्पसचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या नव्या विद्यापीठाची संकल्पना २००७ मध्ये भारताचे तत्कालिन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी बिहारमधील विधानसभेतील एका विधेयकाद्वारे मांडली होती.

विद्यापीठात २ शैक्षणिक विभाग
नालंदा विद्यापीठात दोन शैक्षणिक विभाग आहेत. यामध्ये ४० वर्ग आहेत. येथे एकूण १९०० मुलांची बसण्याची व्यवस्था आहे. विद्यापीठात ३०० आसन व्यवस्था असलेली दोन सभागृहेही आहेत. यासोबतच २ हजार लोकांची आसन व्यवस्था असलेले आंतरराष्ट्रीय केंद्र आणि अ‍ॅम्फी थिएटरही बांधण्यात आले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी फॅकल्टी क्लब, स्पोर्टस कॉम्प्लेक्सच्या सुविधा आहेत.

विविध ज्ञानशाखा सुरू
या परिसरात एक विशाल ग्रंथालय उभारण्यात आले असून येथे पदव्युत्तर शिक्षण, पीएचडीसह अल्पकालीन सर्टिफिकेट कोर्ससह इतर अनेक ज्ञानशाखांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एके काळी आंतरराष्ट्रीय ज्ञानाचे केंद्र असलेल्या या नव्या विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी १३७ शिष्यवृत्तींची तरतूद करण्यात आली आहे.