केंद्राचा निर्णय, सोयाबीन, भात, ज्वारी, कापूस, मुगाचा समावेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (१९ जून) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतक-यांसाठी मोठी घोषणा केली असून भात, कापूस यांच्यासह अन्य १२ पिकांच्या एमएसपी दरात वाढ करण्यात आली. सरकारच्या या निर्णयाचा शेतक-यांना मोठा फायदा होणार आहे.
आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तेलबिया आणि कडधान्यांसाठी एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. नायजरसीड (रामतील) प्रतिक्विंटल ९८३ रुपयांनी वाढले. त्यानंतर तीळ ६३२ रुपये प्रतिक्विंटल आणि तूर डाळ ५५० रुपये प्रतिक्विंटलने एमएसपीत वाढ झाली. शेतक-यांना एमएसपी म्हणून सुमारे २ लाख कोटी रुपये मिळतील, गेल्या हंगामापेक्षा हे ३५ हजार कोटी रुपयांनी अधिक आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.