वायू प्रदूषणाने एका वर्षात जगात २१ लोकांचा बळी

yongistan
By - YNG ONLINE

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 
वायू प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. २०२१ मध्ये वायू प्रदूषणामुळे जगातील ८.१ दशलक्ष (८१ लाख) लोकांचा संपूर्ण जगभरात मृत्यू झाला. त्यातही भारतात २.१ दशलक्ष (२१ लाख) तर चीनमध्ये २.३ दशलक्ष (२३ लाख) लोकांचा मृत्यू झाला. यासंबंधी हेल्थ इफेक्ट इन्स्टिट्यूटने बुधवार, दि. १९ जून २०२४ रोजी अहवाल प्रसिद्ध केला. यात ही माहिती देण्यात आली.
हेल्थ इफेक्ट इन्स्टिट्यूट ही अमेरिकेतील संशोधन संस्था असून त्यांनी ‘युनिसेफ’बरोबर एकत्र येत हा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार २०२१ मध्ये वायू प्रदूषणामुळे भारतातील ५ वर्षांखालील १,६९,४०० लहान मुलांचा मृत्यू झाला. त्यानंतर नायजेरिया (१,१४,१००), पाकिस्तान (६८,१००), इथिओपिया (३१,१००) आणि बांगलादेश (१९,१००) या देशांचा क्रमांक लागतो. दक्षिण आशियामधील बहुतांश मृत्यूंसाठी उच्च रक्तदाब, चुकीचा आहार आणि तंबाखू यांच्यानंतर वायू प्रदूषण हाच घटक कारणीभूत ठरत आहे.
२०२१ मध्ये वायू प्रदूषणामुळे झालेले मृत्यू हे त्याआधीच्या कोणत्याही वर्षी झालेल्या मृत्यूंपेक्षा अधिक होते. जगभरात भारत आणि चीन या दोन्ही देशांची लोकसंख्या एक अब्जहून अधिक आहे. भारत (२.१ दशलक्ष मृत्यू) आणि चीन (२.३ दशलक्ष मृत्यू) या दोन्ही देशांत एकत्रितपणे झालेल्या मृत्यूंचे प्रमाण हे एकूण मृत्यूच्या ५४ टक्के आहे. यामध्ये दक्षिण आशियामधील पाकिस्तान (२,५६,०००), बांगलादेश (२,३६,३००) आणि म्यानमार (१,०१,६००) या देशांचा; तर आग्नेय आशियामधील इंडोनेशिया (२,२१,६००), व्हिएतनाम (९९,७००) आणि फिलीपाईन्स (९८,२०९) या देशांचा समावेश होतो. याशिवाय आफ्रिका खंडातील नायजेरियामध्ये २,०६.७०० मृत्यू तर इजिप्तमध्ये १,१६,५०० मृत्यू झाले आहेत.