जगभरात भारतीय अर्थव्यवस्था सुसाट

yongistan
By - YNG ONLINE
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सध्या संमिश्र परिस्थिती दिसत आहे. एकीकडे देशाचे जीडीपी आकडे सातत्याने उत्साहवर्धक असताना जागतिक पातळीवरही देशासाठी आव्हानात्मक स्थिती दिसत आहे. यादरम्यान, जगभरातील रेटिंग एजन्सी आणि वित्तीय संस्थाही या वर्षासाठी भारताच्या आर्थिक विकासाबाबत (जीडीपी) सकारात्मक अंदाज दर्शवत असून चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर ७ टक्क्यांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

संपूर्ण जगाला भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुसाट वेगवान वाटचालीची खात्री पटली आहे. अलीकडेच एकीकडे सरकारने ८ टक्क्यांहून अधिक विकास दराचे आकडे जाहीर केले तर चालू आर्थिक वर्षासाठी जगभरातील रेटिंग एजन्सींनी भारताचा विकास दर सर्वांत वेगवान असल्याचा विश्वास वर्तवला. भारतीय इकॉनॉमीच्या तुलनेत अमेरिका आणि युरोपचा विकास दर खूपच मागे तर चीनचा वेग सतत मंदावत आहे.
आता जागतिक रेटिंग एजन्सी फिच रेटिंग्सने मंगळवारी चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताचा विकास दर ७.२ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला, जो यापूर्वी केवळ ७ टक्के होता. ग्राहक खर्चात सुधारणा आणि गुंतवणुकीतील वाढीचा हवाला देत फिचने अंदाजात सुधारणा केली. फिचने आपल्या रिपोर्टमध्ये ‘आमचा अंदाज आहे की २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.२ टक्क्यांनी वधारेल.

जून महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ग्रामीण भागातील मागणीत सुधारणा आणि चलनवाढ कमी झाल्यामुळे चालू आर्थिक वर्षात ७.२ टक्के दराने अर्थव्यवस्था वाढीचा अंदाज वर्तवला. रेटिंग एजन्सीने म्हटले की, गुंतवणूक वाढत राहील. परंतु अलीकडील तिमाहींपेक्षा कमी दर तर ग्राहकांचा आत्मविश्वास वाढल्याने ग्राहक खर्चात सुधारणा होईल. खरेदी व्यवस्थापकांचे सर्वेक्षण डेटा पॉइंट्स चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस सतत वाढ दर्शवत आहे.