मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, इ. स. १८६९ - जानेवारी ३०, इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. ते एक वकील, वसाहतविरोधी राष्ट्रवादी नेते आणि राजकीय नैतिकतावादी होते. ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी महात्मा गांधींनी अहिंसक आंदोलनाचा वापर केला. नंतर जगभरातील अनेक नागरी हक्क आणि स्वातंत्र्य चळवळींना महात्मा गांधींकडून प्रेरणा मिळाली. महात्मा असा त्यांचा सन्माननीय उल्लेख प्रथम दक्षिण आफ्रिकेत १९१४ मध्ये केला गेला. आता हा शब्द जगभरात त्यांच्यासाठी वापरला जातो.
गुजरातमधील एका हिंदू कुटुंबात जन्मलेल्या आणि वाढलेल्या गांधींनी इनर टेंपल, लंडन येथे वकिलीचे शिक्षण घेतले. जून १८९१ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी त्यांना व्यवसायासाठी बोलावण्यात आले. भारतात दोन अनिश्चित वर्षे राहिल्यानंतर ते १८९३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत एका भारतीय व्यापा-याच्या दाव्यासाठी गेले. ते २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत कुटुंबासोबत राहिले आणि इथेच असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथम केला. १९१५ मध्ये वयाच्या ४५ व्या वर्षी ते भारतात परतले आणि लवकरच अन्यायकारक जमीन कर आणि भेदभावाच्या विरोधात शेतकरी, कामगार आणि शहरी मजुरांना आंदोलन करण्यासाठी संघटित करण्याचे ठरवले.
इ. स. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. गांधींनी भारतातील ग्रामीण गरिबांची ओळख म्हणून स्वत: कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी साधी राहणी स्वीकारली. त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले.
गांधी हे आजीवन साम्प्रदायीकातावादाचे (सम्प्रदायांवर राजकारण करण्याचे) विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणा-या खिलाफत चळवळीला त्यांनी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले. इ. स. १९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि. मी. (२५० मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. इ. स. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात आणि दक्षिण आफ्रिकेत अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला.
गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला. स्वत:देखील याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यांनी खेड्यांना ख-या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. ब्रिटनमधील विन्स्टन चर्चिल यांनी १९३० साली त्यांची अर्धनग्न फकीर म्हणून निर्भत्सना केली. त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये भारत-पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झालेल्या गांधींनी हिंदू-मुस्लिम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्न केले. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. सुभाषचंद्र बोस यांनी इ. स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते.
२ ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस हा भारतात गांधी जयंती म्हणून आणि जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात राष्ट्रीय सुटी असते. गांधींना सामान्यत: अनौपचारिकपणे भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. त्यांना सामान्यत: बापू म्हटले जाते.
गोपाळ कृष्ण गोखले गांधीजींचे गुरू
इ. स. १९१५ मध्ये गांधीजी द. आफ्रिकेतून भारतात परत आले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक संमेलनांतून बोलले. भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी करून दिला. गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रमुख नेते होते. आजही ते गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात. गांधींनी गोखल्यांचा ब्रिटिशांच्या परंपरांवर आधारित उदार दृष्टिकोन अनुसरला आणि तो पूर्णपणे भारतीय दिसण्यासाठी बदलला. १९२० मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्यावर ते राष्ट्रीय सभेचे प्रमुख नेते बनले.