यूपीएससीचे अध्यक्ष सोनी यांचा राजीनामा

yongistan
By - YNG ONLINE
खेडकर प्रकरणामुळे गोत्यात?, चर्चेला उधाण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात पूजा खेडकर प्रकरणावरून यूपीएससीची लक्तरे वेशीवर टांगली गेली असतानाच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) अध्यक्ष मनोज सोनी यांनी शनिवार, दि. २० जुलै २०२४ रोजी राजीनामा दिला. निवडीसाठी यूपीएससी उमेदवारांकडून बनावट जात आणि अपंगत्व प्रमाणपत्र वापरण्याबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा आल्याने भूवया उंचावल्या आहेत. या राजीनाम्याला पूजा खेडकर प्रकरणाची तर किनार नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मनोज सोनी, यांनी मे २०२२ मध्ये यूपीएससी चेअरपर्सन म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या कार्यकाळाला अजून पाच वर्षे बाकी आहेत. मनोज सोनी यांनी महिनाभरापूर्वीच आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला. मात्र, त्यावर सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. सोनी यांच्या राजीनाम्याचा सध्या सुरू असलेल्या वादाशी संबंध नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.

अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी डॉ. सोनी यांनी २८ जून २०१७ ते १५ मे २०२३ पर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून काम केले. डॉ. सोनी यांनी ३ वेळा कुलगुरू म्हणून काम पाहिले. १ ऑगस्ट २००९ ते ३१ जुलै २०१५ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सलग दोन टर्म आणि एप्रिल २००५ पासून महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बडोदाचे (एमएसयू ऑफ बडोदा) कुलगुरू होते. बडोद्याच्या एमएसयूमध्ये रुजू होताना डॉ. सोनी हे भारतातील सर्वात तरुण कुलगुरू होते. वैयक्तिक कारणास्तव सोनी यांनी राजीनामा दिला.